Curfew extended by one day in Dharangaon धरणगावात शहरातील संचारबंदीत एक दिवसांची वाढ
Curfew extended by one day in Dharangaon धरणगाव : शहरातील वादग्रस्त जागेवरील अतिक्रमण हटवल्यानंतर शहरात शांतता अबाधीत ठेवण्यासाठी प्रांताधिकार्यांनी 48 तासांसाठी संचारबंदी लावली होती मात्र अत्यावश्यक सेवा या काळात सुरू ठेवण्यात आल्या होत्या तर शांतता कायम अबाधीत राहण्यासाठी शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून तर शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संचारबंदीत पुन्हा वाढवण्यात आली असल्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी गुरुवारी रात्री काढले आहेत.
48 तास संचारबंदी
शहरालगत असलेल्या गट नं. 1248/2 मधील वादग्रस्त अतिक्रण नुकतेच मोठ्या बंदोबस्तात शांततेत काढण्यात आल्यानंतर शुक्रवार सकाळी आठ वाजेपर्यंत कर्फ्यू अर्थात संचारबंदी लावण्यात आली त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.


खबरदारी म्हणून लावली संचारबंदी
गायरान बचाव मंचच्या वतीने धरणगाव येथील गट क्र 1248 व गट नं 1248/9 या गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठाण, मुंबई यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावेत, अशी तक्रार केली होती. त्यावर जळगाव जिल्हाधिकारी यांनी तात्काळ अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश काढले होते. त्यानंतर हेच आदेश नाशिक आयुक्तांनी कायम ठेवले होते. त्यामुळे धरणगाव पोलिसांनी शांतता कमेटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी तथा महसूलच्या अधिकार्यांनी गावात सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले. तसेच वादग्रस्त परिसरात कलम 144 लागू केले असल्याचे जाहीर केले. तसेच संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. धरणगावकरांनी घेतली सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे त्याच ठिकाणी वातारवण निवळले होते. परंतू खबरदारी म्हणून सायंकाळी संपूर्ण शहरात दोन दिवसासाठी कर्फ्यू अर्थात संचारबंदी लावण्यात आली होती.
शहरातील मुख्य भागात कडक बंदोबस्त कायम !
शहरातील मुख्य भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता. त्यात 100 पोलीस कर्मचारी, 20 महिला कर्मचारी, 4 आरसीपी प्लाटून, 10 पोलीस अधिकारी आणि 2 डीवायएसपी दर्जाचे अधिकारी यांचा समावेश होता. दरम्यान, अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचा गावात कुठेही तणाव जाणवला नाही. सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
पोलिसांच्या अहवालानंतर पुन्हा 24 तास संचारबंदी
गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यास संचारबंदीमुळे मोठी मदत झाल्याने संचारबंदी एक दिवसांनी वाढवून द्यावी असा अहवाल धरणगाव पोलिस निरीक्षकांनी दिल्यानंतर शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकार्यांनी काढले आहेत मात्र हा आदेश हा अत्यावश्यक सेवा जसे रुग्णसेवा, पाणीपुरवठा, आरोग्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था, अंत्यविधी तसेच शासकिय कर्तव्यावर हजर शासकीय अधिकारी / कर्मचारी, धरणगाव शहरातून जानारे मुख्य रस्त्यावरुन वाहतूक तसेच पोलीस अधिकारी व बंदोबस्तातील कर्मचारी यांना लागु राहणार नाही, असे आदेशात नमूद आहे.