भुसावळच्या धावपटूंचे कार्य धावदूतासारखे : सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप काटे
‘वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमात गुणवंत धावपटू व सायकलपटूंचा सन्मान’
भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंचे कार्य गौरवास्पद असून ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी उद्याचे धावदूत आहेत, असे गौरवोद्गार सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप काटे यांनी काढले. 150 हून अधिक धावपटू भुसावळसारख्या लहान शहरात एकत्र धावतात याचे देखील त्यांनी विशेष कौतुक केले. भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते डॉ.नीलिमा नेहेते, सीमा पाटील, दीपा स्वामी, उमेश घुले, संजय भदाणे या गुणवंत धावपटूंचा तर विद्याधर इंगळे या गुणवंत सायकलपटूचा सत्कार करण्यात आला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
शिवाय विजय फिरके यांनी हाफ आयर्नमॅनची स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल तर आयुष मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या योगा मास्टर लेव्हल -6 या परीक्षेत संपूर्ण देशात प्रथम आल्याबद्दल पूनम कुलकर्णी यांचा त्यांनी विशेष सत्कार केला. याप्रसंगी व्यासपीठावर जळगाव रनर्स ग्रुपचे अध्यक्ष श्री किरण बच्छाव व भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.प्रवीण फालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भेल इंडिया लिमिटेडचे मुख्य प्रबंधक दिनेश जावळे, राधाकृष्ण प्रभात फेरीचे प्रणेते राधेश्याम लाहोटी यांचे स्वागत प्रवीण वारके व गणसिंग पाटील यांनी केले. त्यानंतर डॉ.संदीप काटे यांचा भुसावळ रनर्सतर्फे प्रा.प्रवीण फालक व डॉ.तुषार पाटील यांनी विशेष सत्कार केला. याप्रसंगी त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल विशेष मानपत्र प्रदान करण्यात आले. मानपत्राचे वाचन प्रवीण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार डॉ.चारुलता पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रवीण वारके, गणसिंग पाटील, डॉ.वर्षा वाडीले, प्रशांत वंजारी, आनंद सपकाळे यांनी सहकार्य केले.


