महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी : कसब्यातील पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी


Congress Candidate Ravindra Dhangekar Wins Kasbapethपुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीवर या पोटनिवडणुकीचा मोठा परिणाम होणार आहे.

पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला यश
कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. आता भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत पुन्हा जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणार्‍या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू!, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पैशाच्या धुरात भाजपा सरकार खाक : रवींद्र धंगेकर
: ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे महाविकास आघाडीचे सरकार भारतीय जनता पक्षाने कुरघोड्या करून पायउतार केले. त्याचा राग जनतेमध्ये होता. तो मतदानाच्या रुपातून व्यक्त झाला असून, ही महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी आहे. येत्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देतील,’ असा विश्वास कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला. ‘कसब्यात झालेल्या पैशांच्या धुरात भाजप-शिंदे सरकार जळून खाक झाले,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे व संजय मोरे या वेळी उपस्थित होते.

पुण्यात अक्षरशः पैशांचा पाऊस
‘गेल्या पंधरा दिवसांपासून पुण्यात पैशांचा पाऊस पाडला गेला. अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही पोटनिवडणूक हाताळली गेली व पैशांचे राजकारण केले गेले. त्यामुळे भविष्यात भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता उमेदवार म्हणून उभा राहिल्यास त्याच्यापुढे मोठे संकट निर्माण होणार आहे. ही निवडणूक हुकुमशाहीकडे नेण्याचे काम मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्यांनी केले. त्याविरोधात मी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केले. जनतेच्या दरबारात मला न्याय मिळाला,’ असेही रवींद्र धंगेकर म्हणाले.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !