वरणगावात भीषण पाणी टंचाईमुळे : शिवसेनेतर्फे स्वखर्चातून टँकरने पाणीपुरवठा
Due to severe water shortage in Warangaon: Shiv Sena supplies water by tanker at its own expense भुसावळ : तालुक्यातील वरणगाव शहरात गेल्या 20 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने शिवसेना शहप्रमुख संतोष माळी यांनी वॉर्डातील नागरीकांना स्वखर्चाने टँकरद्वारे शुक्रवारी पाणी वाटप केल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला.
पाणीटंचाईने नागरीक त्रस्त
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वरणगाव शहरात भीषण पाणीटंचाईचा सामना नागरीकांना करावा लागत असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील हातपंपदेखील नादुरुस्त असल्याने अधिकच गैरसोय होत आहे. नगरपरीषदेचे या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून पाणीटंचाई समस्यासंदर्भात सर्वात अगोदर शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे नगरपरीषदेत बोंबाबोंब आंदोलन करून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. पाण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा हंडा मोर्चाचा इशाराही देण्यात आला मात्र त्यानंतर समस्या सुटत नसल्याने सामजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शहप्रमुख संतोष माळी यांनी शुक्रवारी सकाळी वॉर्डात स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलवून नागरीकांना वाटप केल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला.

प्रशासकीय काळात मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष
प्रशासकीय काळात वरणगाव नगरपरीषदेने नागरीकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांनी केला आहे. वेळोवेळी नागरी समस्या संदर्भात शिवसेनेने आवाज उठविला असल्याचेही त्यांनी सांगितले. आतातरी वरीष्ठांनी त्वरीत याकडे लक्ष देऊन वरणगावकराना या समस्येतून मुक्त करावे, अशी मागणीही संतोष माळी यांनी केली आहे.
