श्रीकृष्ण अवतारामुळे कर्म व्यवस्थेस बळकटी : हभप लक्ष्मण महाराज
भुसावळ : भगवंताने घेतलेल्या अनेक अवतारांपैकी श्रीकृष्णाचा अवतार विशेष महत्वपूर्ण आहे. यावेळी अधर्मामुळे धर्म भ्रष्ट झाला होता. धर्म संस्थापनेसाठीच भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या अवतारात अवतरले होते. त्यांनी कर्म समजूनच सर्वे कार्य पार पाडली. कार्यसिद्धीसाठी साम-दंड-भेदाचा उपयोग करण्यास ते कचरले नाहीत. पृथ्वीला पापी लोकांपासून मुक्त करण्यासाठीच त्यांनी जन्म घेतला. उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांनी परीस्थितीनुरूप निर्णय घेतले. कर्म व्यवस्थेस त्यांनी सर्वश्रेष्ठ मानले त्यामुळे कर्म व्यवस्थेस बळकटी आली, असे प्रतिपादन श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांनी केले. भुसावळ येथील विठ्ठल मंदिर वॉर्डातील तेली गल्लीत बागुल परीवारातर्फे आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते. चौथ्या दिवसाच्या समारोपाला श्रीकृष्ण जन्माची कथा सांगून त्यांनी श्रीकृष्ण अवताराचे महत्त्व विषद केले. हा सप्ताह 5 मार्चपासून सुरू आहे.
कलियुगात भक्तीचे साधन श्रेष्ठ
पहिल्या दिवशी कथेदरम्यान हभप लक्ष्मण महाराज म्हणाले की, व्यासांनी श्रीमद् भागवत कथेची रचना केली. भागवतात बारा स्कंद असून शुक व परीक्षीत यांचा संवाद आहे. श्रीमद् भागवत कथा श्रवणाने अत्यंत पापी माणसांचा सुद्धा उद्धार होतो. भागवतामुळे भक्ती, ज्ञान व वैराग्य यांची प्रतिष्ठापना होते. त्याचे श्रद्धापूर्वक स्मरण केले तर मानव मुक्तीचा अधिकारी होतो. भागवत कथेत सारी पुराणे, नाना प्रकारची तत्वज्ञाने व दैवतांची उपासना सांगितली आहेत. एक सप्ताहपर्यंत भागवताचे श्रवण करावे. अल्प आयुष्य, अल्प बल, अल्पमती हे कलियुगातील मानवाचे वैशिष्ट्ये आहे तर हरीस्मरणाने व भागवत श्रवणाने मोक्ष हे कलियुगाचे वैशिष्ट्य आहे. भागवत कथा सप्ताहाने भक्तीचा उदय होतो. हरीस्मरणात मन लागते. कलिमल धुऊन निघतो. सत्य, त्रेता व द्वापारयुगात ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती. परंतु कलियुगात भक्तीचे साधन श्रेष्ठ आहे. भक्तीने लवकर भगवंत प्रसन्न होतात. अन्य साधनांची भक्तीपुढे काही गरज भासत नाही, असेही ते म्हणाले.

कथा श्रवणात श्रोते तल्लीन
पहिल्या दिवशी श्रीमद् भागवत महात्म्य सांगताना भक्तीपुत्र ज्ञान व वैराग्य व गोकर्ण कथा सांगितली. प्रथम स्कंदात व्यास व परीक्षित राजाची कथा सांगितली. द्वितीय स्कंदात शुकदेवाची कथा सांगून तृतीय स्कंदात मैत्रेय-विदुर संवाद आणि कर्दमाची गोष्ट सांगितली. दुसर्या दिवशी चतुर्थ स्कंदात दक्षयज्ञ, ध्रुव, वेना, पृथू, प्रचेत, पुरंजन यांची कथा तर पंचम स्कंदात प्रियव्रतवंश, ऋषभदेव व भरतराजाची कथा सांगितली. तिसर्या दिवशी षष्ठ स्कंदात भूगोल व भुवनेश वर्णन, अजामिळ कथा, दक्ष-प्रजापती, विश्वरूप, वृत्रासुराचे पूर्वचरीत्र व मरूद्गणाची उपपत्ती या कथा सांगितल्या. तर सप्तम स्कंदात प्रल्हाद चरित्र सांगितले. चौथ्या दिवशी अष्टम स्कंदात गजेंद्रमोक्ष, समुद्रमंथन, बलि-वामन, मत्स्यावतार या कथा तर नवम स्कंदात सुद्युम्न, च्यवनऋषी, अंबरिष व भगीरथ, राम अवतार, निनीराजा, चंद्रवंश व पुरूरवा-उर्वशी, परशुराम व ययाती चरित्र, दुष्यंत-शकुंतला, रतिदेव व विविधेवंश वर्णन अशा कथा सांगितल्या. तसेच समारोपाला दशम स्कंदाच्या पूर्वार्धातील श्रीकृष्णजन्माची कथा सांगितली. भाविकांनी श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञासह कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक बागुल परीवाराने केले आहे.
