भुसावळकरांना टंचाईत दिलासा : हतनूरच्या आवर्तनाचे पाणी पोहोचले बंधार्‍यात


भुसावळ : शहरात पाणीटंचाईचे चित्र निर्माण होण्यापूर्वीच हतनूरचे आवर्तन पालिकेच्या बंधार्‍यात पोहोचल्याने शहरवासीयांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे. पालिकेच्या बंधार्‍यात सुमारे 40 दिवसांचा जलसाठा करता येतो मात्र बंधार्‍याची पातळी घसरल्याने पालिकेने हतनूर प्रशासनाकडे आवर्तनाची मागणी केली होती. यानुसार हतनूर धरणातून 8.95 दलघमी अर्थात एक हजार क्युसेस डे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर हे पाणी बुधवारी पालिकेच्या बंधार्‍यात पोहोचल्याने शहराचा पाणीप्रश्न सुटला आहे. जलसाठ्यामुळे आता कमी दाबाने होणार्‍या पाणीपुरवठ्याचा प्रश्नही सुटला आहे.

40 दिवसांसाठी पाणीप्रश्न सुटला
शहरासाठी बंधार्‍यातील जलसाठा आगामी 40 दिवस पुरणार असल्याने एप्रिल महिन्याच्या 20 पर्यंत नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरासोबत भुसावळ विभागीय मध्य रेल्वे व दीपनगर वीज निर्मीती केदांकडूनही हतनूर धरणाकडे आवर्तनाची मागणी केल्याने या आवर्तनामुळे शहरातील तापी बंधार्‍यातील रेल्वे व दीपनगरच्या बंधार्‍यातही मुबलक जलसाठा राहणार आहे. दरम्यान, हतनूरच्या धरणातून सोडलेले आवर्तन हे पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने नदीवर कोणीही शेतकर्‍यांनी अथवा अन्य जणांना मोटर लावून पाण्याची चोरी केल्यास त्यांच्या कारवाई केली जाईल, असा इशारा हतनूरचे शाखा अभियंता एस.जी.चौधरी यांनी दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !