घरकुल घोटाळा भोवला : जळगाव महापालिकेतील चार नगरसेवक अपात्र
Gharkul Scam : Four corporators of Jalgaon Municipal Corporation disqualified जळगाव : राज्यात गाजलेल्या जळगावातील घरकुल घोटाळा प्रकरणात नगरसेवकांना शिक्षा लागल्यानंतर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात शिक्षा झालेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिकेद्वारे मागणी केली होती. या प्रकरणी गुरुवारी न्यायालयाने निकाल देत पाच पैकी चार नगरसवेकांना अपात्र ठरवल्याने जळगावातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याचिका कर्त्यांकडून अॅड.सुधीर कुलकर्णी यांनी काम पाहिले. नगरसेवक लता भोईटे, भगतभाई बालानी, कैलास सोनवणे, सदाशिवराव ढेकळे यांना न्यायालयाने अपात्र ठरवले आहे.
निवडणुकीच्या तोंडाला भाजपाला धक्का
जळगाव महापालिकेत गाजलेल्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी नगरसेवकांना शिक्षा झाली होती व या शिक्षा झालेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी याचिकेद्वारे न्यायालयात केली होती. दोन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ शिक्षा भोगलेल्या नगरसेवकांना पदावर राहता येत नसल्याचा निर्णय असल्याने त्या आधारे याचिका दाखल करण्यात आली होती. गुरुवारी याचिकेवर न्यायालयाने निकाल देत चार नगरसेवकांना अपात्र ठरवले.
महापालिकेतील भारतीय जनता पार्टीचे तसेच मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक चार नगरसेवक अपात्र झाल्याने भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसल्याचे मानले जात आहे.

इतर नगरसेवकांना मिळणार बोध : प्रशांत नाईक
विविध कारणांमुळे जळगाव महानगरपालिकेतील पाच नगरसेवकांविरुद्ध जळगाव जिल्हा न्यायालयामध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी दाद मागितली होती. न्यायदेवतेवर प्रचंड विश्वास असल्यामुळे गुरुवारी न्यायालयाने निकाल दिला आहे. पाच नगरसेवकांपैकी दत्तू कोळी यांच्या शिक्षेला स्थगिती असल्यामुळे इतर चार नगरसेवक लता भोईटे, भगतभाई बालानी, कैलास सोनवणे, सदाशिवराव ढेकळे यांना न्यायालयाने अपात्र ठरवले आहे. घरकुल घोटाळ्यामध्ये न्यायालयाने नगरसेवकांना दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा सुनावल्याने हे नगरसेवक राहण्यास अपात्र होते. आता न्यायालयात अपात्र झाल्याने इतर नगरसेवकांना देखील यातून बोध मिळेल, असे प्रशांत नाईक म्हणाले.