भुसावळातील दोघे तरुण गोळीबारात जखमी : तालुक्यात मोठी खळबळ
Two youths injured in firing in Bhusawal : Great excitement in the talukA भुसावळ : भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळील एका शेतात दोघा तरुणांवर तीन संशयीतांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडत गोळीबार केल्याने भुसावळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. हल्लेखोरांच्या गोळीबारात अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (24, भुसावळ) हे दोघे तरुण जखमी झाले असून त्यांना डोक्याला व पोटाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबाराचे कारण अस्पष्ट असलेतरी समजलेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आला.
गोळीबाराच्या घटनेने भुसावळ तालुक्यात खळबळ
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगेश व अक्षय आदी दुचाकीने जेवणासाठी निघाल्यानंतर साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळील एका शेतानजीक तरुणांवर हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडल्याने दोघे तरुण जखमी झाले. दोघा तरुणांवर अज्ञातांनी गोळीबार माहिती तालुका पोलिसांना कळाल्यानंतर भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, भुसावळ तालुका निरीक्षक विलास शेंडे, सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे व तालुका पोलीस ठाण्याच्या सहकार्यांनी धाव घेतली. अक्षय सोनवणे या तरुणाला सुरूवातीला गोदावरीत हलवण्यात आले असून या तरुणाच्या पोटाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे तर दुसरा जखमी मंगेश काळे याच्या डोक्याला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती असून त्याच्यावरही गोदावरीत उपचार सुरू आहेत.
गोळीबाराला पूर्व वैमनस्याची किनार
दोघा तरुणांवर गोळीबार झाल्याच्या घटनेने भुसावळसह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादानंतर तरुणांवर गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाल्यानंतर त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गोळीबाराच्या घटनेनंतर गोदावरी रुग्णालयात धाव घेत जखमीची भेट घेत गोळीबार झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
