सावद्यात अमृत योजनेसाठी निविदा प्रसिद्ध : लवकरच सुरू होणार काम
सावदा : शहरासाठी बहुप्रतीक्षित व शहराच्या पाणीपुरवठ्याचे दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अश्या अमृत योजनेसाठीच्या निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे हे काम लवकर सुरू होण्याच्या आशा निर्माण झाल्या असून शहराचा पाणी प्रश्न या माध्यमातून सुटण्यास मदत होणार आहे. सावदा शहरात व नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या भागांना व भविष्याच्या दृष्टीने शहरासाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या या अमृत योजनेची 14 कोटी 65 लाख रुपयांची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली. योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अनेक महत्वाची कामे केली जाणार आहे. शहराचा भविष्यातील पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याने शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
14 कोटी 65 लाखातून होणार काम
अमृत योजनेंतर्गत शहरात नवीन पाईपलाईन टाकणे, मांगलवाडी येथून सावदा येथे येणार्या पाण्याच्या पाईप लाईन लाईनचे काम करणे, जॅकवेल व पंप हाऊसचे काम करणे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तेथे लहान पूल व रस्ते बांधणे, पाणी डिस्ट्रीब्युशन करणे, पाईपलाईन टाकल्यानंतर रोड तयार करणे, कंपाउंड वॉल बांधणे, ड्रेनेज दुरुस्ती करणे, रॉ वॉटर पम्पिंग मशनरी टाकणे, स्वामी नारायण नगरातील पाण्याची टाकी दुरुस्त करणे आदी महत्वपूर्ण कामे या योजनेत समाविष्ट आहेत. 14 कोटी 65 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली असून आता कोणत्या कंपनी वा व्यक्ती कडे हे काम जाते व ते सुरू ते कधी सुरू होते ? याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
