भुसावळ शहरातील अनेक भाग अद्यापही अंधारात

बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व जोडणी पूर्ण होणार असल्याचा महावितरण कंपनीचा दावा


Many parts of Bhusawal city are still in darkness भुसावळ : शहरात शनिवारी झालेल्या वादळानंतर ठप्प झालेला वीजपुरवठा तिसर्‍या दिवशीही सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. शहरातील अनेक भागात अद्यापही वीजपुरवठा ठप्प झाल्याने नागरीक प्रचंड संतप्त झाले असून महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात टिका करीत आहेत. शनिवारी सायंकाळी अवकाळी वादळी पावसात 80 वर ठिकाणी वीज तारा तुटल्या होत्या तर सुमारे 30 हून अधिक ठिकाणचे पोल वाकले होते. शनिवारनंतर यावल रोड भागात सोमवारी दुपारी तीन वाजता सुरळीत वीजपुरवठा करण्यात यश आले मात्र शहरातील अनेक भागात अद्यापही वीज गुल आहे. शहरातील अनेक भागात नागरीकांनीच स्वत: पुढाकार घेत जोडणी करून घेतली आहे.

या भागातील वीजपुरवठा खंडीत
खडका रोडवरील जाम मोहल्ला, मॉडर्न रोड, सहकार नगर भागातील पत्री शाळा भाग, गजानन महाराज नगर भाग, चिंतामणी विहार तापी नगर, कार्यकारी अभियंता कार्यालय परिसर, बीएसएनएल ऑफिस भाग, सोनिच्छा वाडी परिसर, हनुमान नगर, गणेश पुरी, महेश नगर, विकास कॉलनी महालक्ष्मी हार्डवेअरच्या मागील भाग आदी भागातील वीजपुरवठा मंगळवारीदेखील सुरळीत झाला नसल्याने नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. श्रीनगर भागातील तक्रारीनंतरही तारा जोडण्यात न आल्याने खाजगी वीज सहायकाच्या मदतीने स्वखर्चाने वीज तारा जोडण्यात आल्या. हे कार्य सुरू असताना त्याच ठिकाणी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी.टी.महाजन यांनी भेट दिली. पावसाळ्यात नागरीकांना त्रास होणार नाही, आतापासून नियोजन करावे, अशी मागणी प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे.

पाणीपुरवठा विस्कळीत : रोटेशन तीन दिवस पुढे
शनिवारी सायंकाळी खंडित झालेला वीजपुरवठा तिसर्‍या दिवशी सुरू झाल्यानंतर
पालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा कार्यान्वीत झाली मात्र त्यामुळे तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा पुढे लोटला गेला आहे. शनिवारी सायंकाळी पाचला वादळी पाऊस झाला शिवाय गारपीट झाल्याने जलशुध्दीकरण केंद्राचा पाणीपुरवठा खंडीत झाला. सोमवारपासून शहरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून बुधवारी शहरातील 32 खोली परीसर, लकीभानगर, मोहंम्मदी नगर, ग्रीन पार्क या भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे.

सोमवारी आंदोलनाचा इशारा
शहरासह तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबाबत कार्यकारी अभियंता पी.आर. घोरुडे यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिवसेना (उध्दव ठाकरे गट) पदाधिकार्‍यांना माघारी परतवण्यात आल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर सोमवार, 8 एप्रिल रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अधिकारी फोन उचलत नाही शिवाय सबस्टेशनमधील कम्लेंटसाठी असलेला दूरध्वनी सातत्याने बिझी ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना नागरीकांनी केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक कार्यकारी अभियंत्यांना भेटीसाठी गेले मात्र त्यांनी भेटण्यास नकार दिल्याने शिवसैनिकांनी सोमवार, 8 रोजी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हाप्रमुख समाधान महाजन, तालुका प्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभाक्षेत्र संघटक बबलू बर्‍हाटे, शहरप्रमुख हेमंत खंबायत, शहरप्रमुख दीपक धांडे, शिवसेना आणि सर्व अंगीकृत संघटना आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !