फुलझाडांच्या कुंड्यांद्वारे भुसावळातील स्मशानभूमी बहरणार
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते उपक्रमाचे लोकार्पण
The cemetery in Bhusawal will blossom through flowerpots भुसावळ : शहरातील तापी काठावरील हिंदू स्मशानभूमी साई जीवन सुपर शॉपीने दत्तक घेतली असून या स्मशानभुमीत सौंदर्यीकरणासाठी दोन हजार फुलझाडांच्या कुंड्या ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. रविवारी या उपक्रमातून स्व.राजेंद्र दायमा प्रतिष्ठानतर्फे 100 फुलझाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
शहरातील हिंदू स्मशानभुमी साईजीवन सुपर शॉपने दत्तक घेतली असून या ठिकाणी अंतर्गत भागात सुशोभिकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून रविवारी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्व.राजेंद्र दायमा यांच्या जयंतीनिमित्त स्व.राजेंद्र दायमा प्रतिष्ठानतर्फे 100 फुलझाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. मोगरा, सदाफुली, गुलाब, जाई, जूई, चाफा आदींसह विविध शोभीवंत प्रकारातील झाडांच्या कुंड्यांमुळे सौंदर्यात भर पडेल. या उपक्रमाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. स्मशानभूमीचे गेल्या काळात आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून नुतनीकरण झाले आहे. या स्मशानभूमीचे सौंदर्य वाढवून या ठिकाणी अंत्ययात्रेसाठी येणार्या नागरीकांना आपल्या दु:खातून काही अंशी तरी सावरता यावे, असा प्रयत्न असल्याचे यावेळी माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी सांगितले. या उपक्रमाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले.

यावेळी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नवलसिंग पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील, कॉटन सेलचे संचालक प्रमोद सावकारे, सुरजीतसिंग गुजराल, माजी नगरसेवक निर्मल कोठारी, राजू पारीख, स्व.राजेंद्र दायमा प्रतिष्ठानचे अॅड.निर्मल दायमा, दीपक टेकवानी, विजय चोरडीया, प्रवीण चौधरी, जसप्रीत गुजराल, क्रिश कोठारी, भैय्या ठाकूर, गजानन चव्हाण आदी उपस्थित होते.
