चाळीसगावला व्ही. एच. पटेल प्रा.विद्यालयात झाले अनोखे सामुहिक रक्षाबंधन
बांधला ममत्वाचा धागाः ३५० विद्यार्थ्यांचा सहभाग
चाळीसगाव : बहिण – भावाच्या अतूट नात्याचे प्रतिक असणा-या रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयात चिमुल्यांनी मंगळवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. यात १७५ मुलांना १७५ मुलींनी राखी बांधली तर मुलांनी त्यांना ‘भावाचे गिफ्ट’ भेट दिले.
बुधवारी रक्षाबंधन ही पर्वणी आहे. भावाच्या मनगटावर बहिण आपल्या रक्षाणाचा धागा घट्ट बांधत त्याच्याकडून हे वचनच घेत असते. भावा – बहिणीचे नाते थोडे खट्याळ तर थोडे गोडही असते. एरवी भांडणारे भाऊ – बहिण रक्षाबंधनाला ममत्वाच्या धाग्यानी जोडले जातात. मंगळवारी ही पर्वणी येथे जल्लोषात साजरी झाली. यशस्वितेसाठी त्रिशला निकम, अनिल महाजन, राजश्री शेलार, मनिषा सैंदाणे, शर्वरी देशमुख, अजयराव सोमवंशी, सचिन चव्हाण, प्रशांत महाजन, स्मिता अमृतकार, दिपाली चौधरी, ज्योती कुमावत, कविता साळुंखे, रंजना चौधरी, रेखा चौधरी, सचिन पाखले यांच्यासह दत्तात्रय गवळी, राहुल चव्हाण यांनी सहकार्य केले.
चिमुरड्या भावांनी बहिणींसाठी आणली भेट
मुलींनी मुलांच्या मनगटावर विविध रंग व आकाराच्या राख्या बांधल्या. बहिणींच्या ममत्वाचा गोडवा अधिक गोड करण्यासाठी मुलांनी घरुन शाळेत येतांना वेगवेगळी भेट आणली होती. यात चाॕकलेट, खाऊची पाकिटे यांचा समावेश होता. ही भेट मुलांनी मुलींना दिली. एकमेकांमधील या स्नेहाने त्यांचे साजिरे – गोजिरे चेहेरे हसरे झाले होते. मुख्याध्यापिका मंजूषा नानकर, शिक्षक जिजाबराव वाघ यांनी रक्षाबंधन सणाची माहिती सांगतांना भाऊ – बहिणीच्या नात्यांतील मायेचे धागेही उलगडले. उपक्रमाचे संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल, संस्थाध्यक्ष रामकृष्ण पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचीव डॉ. विनोद कोतकर, आ.बं. मुलांच्या विद्यालयाचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, मुलींच्या विद्यालयाचे अध्यक्ष अॕड. प्रदीप अहिरराव, वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन सुरेश स्वार, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन शामलाल कुमावत यांनी कौतुक केले.
