भुसावळात प्रबोधनपर देखाव्यांसह समाजोपयोगी उपक्रमातून वेधावे लक्ष
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे : भुसावळात गणेश मंडळांची बैठक
Attention should be drawn from social activities with enlightening scenes in Bhusawal भुसावळ : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांनी मोठ्या आवाजाचे वाद्य न लावता पारंपरीक वाद्य लावावे जेणेकरून ध्वनी प्रदूषण टाळता येईल शिवाय मंडळांनी प्रबोधनपर देखावे सादर करावेत तसेच रक्तदानासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी गणेश मंडळ पदाधिकार्यांच्या आयोजित बैठकीत केले. संतोषी माता हॉलमध्ये गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. यावेळी पोलीस उपअधीक्षक पिंगळे म्हणाले की, महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्या गणेश उत्सव राज्यातील उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम पुरस्कार विजेत्या मंडळाला पाच लाखांचे पुरस्कार मिळणार असल्याने शहरासह ग्रामीण भागातील मंडळांनी सहभागी व्हावे.
निकषांद्वारे मिळणार पारीतोषिक
पिंगळे म्हणाले की, या स्पर्धेमध्ये धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. सहभागी होणार्या सार्वजनिक गणेशोत्सव उत्कृष्ट मंडळांची पुरस्कारासाठी निवड विविध निकषांच्या आधारे करण्यात येणार आहे. पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव राज्य शासनाकडून पारीतोषीक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक विजेत्यास पाच पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांक विजेत्यास दोन लाख 50 हजार तर तृत्तीय क्रमांक विजेत्यास एक लाख रुपयांचे पारीतोषिक दिले जाईल. त्यासाठी पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, शिस्तबद्ध मिरवणूक, ऐतिहासीक देखावा, सामाजिक उपक्रम, देशी खेळांच्या स्पर्धा आदी निकष आहेत.
मुस्लीम बांधव डीजेचा वापर टाळणार
पोलीस उपअधीक्षक पिंगळे म्हणाले की, ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशी हे उत्सव एकाच दिवशी येत असल्याने दोन्ही मिरवणुका समोरा-समोर येऊ नयेत म्हणून मुस्लीम धर्मियांनी ईद ए मिलादची मिरवणूक दुपारी 12 वाजेपर्यंत संपवण्याचे नियोजन केले असून मिरवणुकीत डीजेचा वापर टाळण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. गणेशोत्सवात महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक कार्यरत असेल शिवाय श्री मंडळींनी समाजप्रबोधनपर देखावे सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
पालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत
बैठकीला शहर पोलीस निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठ निरीक्षक बबन आव्हाड, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे परीवेक्षाधिन डीवायएसपी सतीश कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त करीत सूचना केल्यात. नाना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मंडळाच्या पदाधिकार्यांनी पालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्यात. माजी नगरसेवक किरण कोलते, शिशिर जावळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रत्येक मंडळांनी रीतसर परवानगी काढण्याचे आवाहन पोलिसांनी यावेळी केले.
