वरणगावातील केंद्रीय विद्यालयात माकडांच्या हल्ल्यात 14 विद्यार्थी जखमी
14 students injured in monkey attack in Kendriya Vidyalaya in Warangaon भुसावळ : वरणगाव शहरातील केंद्रीय विद्यालयात प्रार्थनेनंतर वर्गात जात असलेल्या 14 विद्यार्थ्यांवर अचानक 20 ते 25 माकडांनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी आठ वाजता घडली. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची पळापळ होवून चेंगराचेंगरी झाल्याने एका विद्यार्थिनीचा हात फ्रॅक्चर झाला. दरम्यान, या परीसरात बिबट्याची दहशत असताना आता माकडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याने विद्यार्थी तणावाखाली आहेत.
अचानक झालेल्या हल्ल्याने पळापळ
वरणगाव आयुध निर्माणीच्या केंद्रीय विद्यालयात सोमवारी सकाळी आठ वाजता प्रार्थना संपल्यानंतर विद्यार्थी वर्गात जात असताना 20 ते 25 माकडांनी अचानक विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर विद्यार्थी भेदरले व त्यांनी आरडा-ओरड करीत पळापळ सुरू केल्याने त्यात 14 विद्यार्थी जखमी झाले. या घटनेत विद्यार्थी प्रशिक सोनवणे (11), वैष्णवी सोनवणे (11), अनुष्का कुमारी (8), स्वरा माळी (9), गौरी गवळी (9), जान्हवी मराठे (11), अक्षरा गोखले (11), नक्षत्रा मोरे (11), करुणा जैन (9), दिव्या पाटील (8), कंचन पाटील (8), साहील सुरवाडे (8), खुषी भोळे (8), रशीता सोनवणे (11) हे जखमी झाले आहे .






फॅक्टरी प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच उपमहाप्रबंधक महेश शिंदे, सुनील टाकलकर, कनिष्ठ कर्यप्रबंधक धनेश्वर चौधरी यांनी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने रुग्णवाहिकेद्वारे वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेत करूणा जैन या मुलीचा हात फ्रॅक्चर झाला असून तिच्यावर भुसावळ खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून अन्य विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.


