पांढरा भिलावा विकत घेण्याच्या बहाण्याने नाशिकच्या प्रौढाला यावलमध्ये मारहाण करीत लूटले
A Nashik adult was beaten up and robbed in Yawal on the pretext of buying white Bhilawa यावल : नाशिक शहरातील 47 वर्षीय प्रौढाला युट्युबद्वारे पांढरा बिबवा (भिलावा) विकत देण्याच्या बहाण्याने यावलला बोलावून दहिगाव शिवारातील भोनक नदीत चौघांनी बेदम मारहाण करीत पाच हजारांची रोकड व मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
टोळी सक्रिय झाल्याची चर्चा
नाशिक शहरातील मल्हारी भवन, जैनवाडा येथील रहिवाशी महेश मंगलसिंग चव्हाण (47) यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्याशी एकाने युट्युबवर द्वारे संपर्क करीत तुम्हाला पांढरा बिबवा (भिलावा) देतो असे सांगून नाशिकवरून यावलला बोलावले व कुठे आहे पांढरा बिबवा असे विचारले असता त्यांना त्यांच्याच दुचाकीवर बसवून दहिगाव शिवारातील, चुंचाळे गावाकडे जाणार्या कच्च्या रस्त्याने भोनक नदीच्या झाडाझुडपात नेले. तेथे चार अनोळखी इसमांनी त्यांना जबर मारहाण केली व त्यांच्या पँटच्या खिशातील पाच हजार रुपये आणि मोबाईल बळजबरीने काढून पळ काढला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे डी.वाय.एस.पी. डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.








