भुसावळ पालिकेला गवसला रस्त्यांच्या दुरुस्तीचा मुहूर्त


Time to repair roads to Bhusawal Municipality भुसावळ : शहरातील खिळखिळ्या झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेला मुहूर्त गवसला असून रस्त्यांच्या डागडूजीला सुरूवात झाल्याने नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क व डागडूजीचे काम केले जाणार होते मात्र निविदा प्रक्रियेमुळे विलंब झाला. गेल्या दोन महिन्यांपूर्वी या कामासाठी ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात आली होती मात्र काम रखडले होते. अखेर गणेशोत्सवापूर्वी जामनेररोड, मिरवणूक मार्ग आदींचे काम मंगळवारपासून सुरू झाल्याने वाहनधारकांसह गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिरवणूक मार्गाचे पॅचवर्क
शहरात पावसाळ्यापूर्वी पालिकेने रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी निविदा काढली होती मात्र ही प्रक्रिया अंत्यत संथगतीने असल्याने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे पॅचवर्क झाले नाही. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचून त्यांचा आकार वाढत गेला. यामुळे सध्या शहरातील यावल, जळगाव, जामनेर, वरणगाव या प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. आगामी सणवारांच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांची डागडूजी होणे अपेक्षीत होते मात्र या कामाला पालिकेडून मुहूर्त गवसत नव्हता. गेल्या महिन्याभरात दमदार पाऊस झाला नाही, मात्र पालिकेकडून पावसाची उघडीप नसल्याने ही कामे होत नसल्याची वल्गना केली जात होती. अखेर नागरीकांचा रोष वाढल्याने मंगळवारपासून जामनेररोडच्या डागडूजीला सुरवात करण्यात आली आहे. या कामात मिरवणूक मार्ग व खड्डेमय रस्त्यांचे पॅचवर्क केले जात असल्याचे ठेकेदार वू पूजा कंन्स्ट्रक्शनचे संचालक प्रमोद नेमाडे म्हणाले.

या रस्त्यांचीही होणार दुरुस्ती
रेल्वे व बसस्थानकाला जोडणार्‍या स्टेशनरोडचीही वाट लागली आहे. या रस्त्यावरुन चालणेही कठीण झाले आहे. यासेाबतच जळगावरोडवरील टेक्नीकल हायस्कूल समोरील खड्डा बुजवला जाणार आहे. शहरातील दगडी पुलाच्या दक्षिणेकडील भाग, पांडूरंग टॉकीज मागील भाग, गंगाराम प्लॉटमधील सर्व रस्ते, भवानी पेठ भाग, जाम मोहल्ला रोड, काझी प्लॉटचा पुल, मुख्य बाजारपेठेतील अंतर्गत रस्ते, भाजी मार्केटमधील मुख्य रस्ता आदींसह अन्य रस्त्यांवर खड्डे या कामात डागडूजी करुन भरले जातील, अशी माहितीही पालिकेच्या सूत्रांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !