भुसावळातील वयोवृद्धेचा मृत्यू : ईईएसएल कंपनीविरोधात गुन्हा
Death of an elderly person in Bhusawal : Crime against EESL company भुसावळ : शहरातील 60 वर्षीय वयोवृद्धेचा ईईएसएल कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना 7 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी दोन वाजता घडली होती. या घटनेला ईईएसएल कंपनीला जवाबदार मानत कंपनीच्या महेंद्रसिंग यादव यांच्याविरोधात तब्बल वर्षभरानंतर बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे मृत्यू प्रकरण
वत्सलाबाई शिवा हतागडे (60, नाहाटा कॉलेजजवळ, भुसावळ) या महिला आपल्या पतीसह वास्तव्याला होत्या. 7 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता शिवदत्त नरगातील भुसावळ नगरपालिका दवाखान्याजवळील कचराकुंडीत त्या कचरा टाकण्यासाठी गेल्यानंतर लोंबकळत असलेल्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श होवून शॉक लागताच त्यांचा मृत्यू ओढवला होता. या घटनेप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या संदर्भात त्यांचे पती शिवा धर्मा हतागडे यांनी न्यायालयात धाव घेत जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.






चौकशी अंती नगरपालिका भुसावळ यांनी पथदिव्याची देखभाल व दुरुस्तीचे संपूर्ण काम पाहण्यासाठी ईईएसएल कंपनीसोबत करार केल्यानंतर करारनाम्यानुसार संपूर्ण जबाबदारी दक्ष इलेक्ट्रिकल्सचे महेंद्रसिंग यादव यांच्यावर होती. त्यानुसार बेजबाबदारपणामुळेच वृद्ध महिलेला इलेक्ट्रिक शॉक लागल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार मयत वृद्ध महिलेचे पती शिवा हताकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दक्ष इलेक्ट्रिकल्स महेंद्रसिंग यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अब्दुल सत्तार शेख करीत आहे.


