सावदा शहरवासीयांना वाढीव घरपट्टीची झळ
रेडीरेकनर दरानुसार 10 ते 50 टक्के वाढ : करवाढ मागे घेण्याबाबत साकडे ; हरकतींसाठी महिन्याची मुदत
Savada City residents face increased housing rent सावदा : शहरातील नागरीकांना वाढीव घरपट्टीबाबत नोटीसा प्राप्त झाल्या असून या नोटीसा हातात पडताच नागरीकांना हात डोक्याला मारून घेण्याची वेळ आली आहे. शहरवासीयांना यंदा मिळालेल्या घरपट्टी 10 ते 50 टक्के वाढ करण्यात आली असून ही वाढ रेडीरेकनर दरानुसार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, वाढीव घरपट्टीमुळे नागरीकांना मोठा मानसिक धक्का बसला असून तातडीने नगरपालिकेने वाढीव घरपट्टी रद्द करावी, अशी मागणी सावदा येथील शिवा संघटना, शहरातील पत्रकार तसेच माजी नगरसेवक राजकीय पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा ईशारादेखील देण्यात आला आहे.
रेडीरेकनर दरानुसार आकारलेली घरपट्टी तापदायक
सावदा शहरात येथे अद्याप म्हणावी तशी औद्योगिक प्रगती झालेली नाही, लोकसंख्यादेखील जास्त नाही व छोटे गाव वजा शहर असतांना व बहुतेक नागरीकांचा व्यवसाय शेती हाच आहे. शहरातील सुमारे सहा हजार मालमत्ता धारकांपैकी आतापर्यंत अडीच हजारांवर नागरीकांना पालिकेकडून वाढीव रेडीरेकनर दरानुसार घरपट्टीची नोटीस बजावण्या आली आहे त्यामुळे नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आधीच जास्तीची असलेली घरांची कर आकारणी मोठ्या प्रमाणात वाढली असताना आता वाढीव दराने आलेल्या घरपट्टीमुळे नागरीकांमधून रोष व्यक्त होत आहे. नागरीकांना वाढीव करावाबाबत काही आक्षेप असल्यास एका महिन्यांच्या आत आक्षेप नोंदवता येणार आहेत. नागरीक घरपट्टी कमी करण्याचे अर्ज घेऊन गेल्यानंतर त्यांना अगोदर अर्धी करपट्टी भरा, मागील बाकी भरा मगच अर्ज स्वीकारू अशी आडमुठी भूमिका पालिकेने घेतल्याने नागरीक संतप्त आहेत.

अन्यायकारक वाढ कमी होण्याची जनतेला अपेक्षा
पसुमारे 10 ते 50 टक्के पर्यंत ही वाढ करण्यात आली आहे. अगोदरच हजारोंच्या घरात असलेली नागरीकांची घरपट्टी पुन्हा वाढली असून घरपट्टीसोबत वृक्षकर व शिक्षणकर देखील वाढला आहे. वाढत्या महागाईचा फटका नागरीकांना जाणवत असताना त्यात आता कर वाढीचे संकट नागरीकांच्या मानगुटीवर बसले आहे त्यामुळे ही अन्यायकारक वाढ कमी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निवेदन देताना यांची उपस्थिती
पनिवेदन देतांना माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख सूरज परदेशी, शिवा संघटना तालुकाध्यक्ष तथा पत्रकार कैलास लवंगडे, पत्रकार तथा माजी नगरसेवक भानुदास भारंबे, पत्रकार दिपक श्रावगे, सागर चौधरी, भरत चव्हाण, प्रशांत सरवदे, फिरोज तडवी, शशिकांत भंगाळे, चंद्रकांत नेमाडे यांच्यासह असंख्य नागरीकांच्या यावर स्वाक्षर्या आहेत.
महिनाभरात हरकती दाखल करता येणार !
पभांडवली मूल्यानुसार कर पद्धत्ती असल्याने दर पाच वर्षांनी कर आकारणी केली जाते. सावदा शहरात सुमारे साडेसहा हजार मालमत्ताधारक आहेत. सावदा पालिकेतर्फे आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक मालमत्ताधारकांना रेडीरेकनर दरानुसार घरपट्टीबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या नागरीकांना हरकती नोंदवायच्या आहेत त्यांना एका महिन्यांच्या आत हरकती नोंदवता येतील, असे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

