भुसावळ ऑर्डनन्समध्ये सिमेंट पत्रे बदलताना 20 फूट उंचीवरुन पडून कामगाराचा मृत्यू


A worker died after falling from a height of 20 feet while changing cement sheets in Bhusawal Ordnance भुसावळ : भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत सिमेंट पत्रे बसविताना 20 फूट उंचीवरुन पडून एका ठेकेदारीतील मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 30 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडली. दिलीप श्रावण रल (37, रा.दुसखेडा, ता.यावल) असे या मृत कामगाराचे नाव आहे. या कामगाराला ठेकेदाराने हेल्मेट किंवा अन्य कोणतेही सेफ्टीची साधने उपलब्ध करुन दिली नसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

उपचारापूर्वीच मालवली प्राणज्योत
भुसावळ आयुध निर्माणीतील के.के.इंटरप्राईजेस या कंत्राटदाराकडे दिलीप रल हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून ठेकेदारी कामगार म्हणून काम करीत होते. शनिवारी आयुध निर्माणीतील एनसीएस या विभागात सिमेंटचे जूने पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्याचे काम सुरू असताना रल उभे असलेल्या सिमेंटच्या पत्राचे शिट तुटल्याने ते 20 फूट उंचीवरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने कामावरील कामगारांनी त्यांना तातडीने आयुध निर्माणी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

सुरक्षा साधनांच्या अभावामुळे मृत्यू
मृत कामगार काम करीत असताना सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत. त्यांच्या डोक्यावर हेल्मेट असते तर डोक्याला होणारी दुखापत टाळता आली असती, मात्र ठेकेदाराने बेजबादारपणा करीत सुरक्षेची साधने पुरविली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मृत दिलीप रल यांच्या पार्थिवाचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. रात्री दुसखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत रल यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परीवार आहे. भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !