आयुध निर्माणीत कामगाराचा मृत्यू : प्रशासन घेणार अपघाताच्या कारणांची माहिती
Death of a worker in ordnance manufacturing : Administration will take information about the causes of the accident भुसावळ : भुसावळ आयुध निर्माणीत शनिवारी सिमेंट पत्रे बसविताना 20 फूट उंचीवरुन पडून दिलीप श्रावण रल (37, रा.दुसखेडा, ता.यावल) या कामगाराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता आयुध निर्माणी प्रशासनाने या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय उच्च स्तरीय समितीचे गठण केले आहे. या समितीच्या माध्यमातून अपघात कसा झाला? या कारणांची चौकशी करणार आहे.
दुर्घटनेच्या कारणांची मिमांसा होणार
भुसावळ आयुध निर्माणीतील के.के.इंटरप्राईजेस या कंत्राटदाराकडे दिलीप रल हे ठेकेदारीवरील कामगार काम करीत होते. शनिवारी आयुध निर्माणीतील एनसीएस या विभागात सिमेंटचे जूने पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्याचे काम सुरू सताना ते कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना आयुध निर्माणीच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. या प्रकरणी आता आयुध निर्माणीने विभागीय स्तरावर आवश्यक कारवाई करण्यासाठी उच्च स्तरीय चौकशी समितीचे गठण केले आहे. या समितीकडून दुर्घटनेच्या कारणांची कारणमिमांसा केली जाईल. जेणेकरुन आगामी काळात अशी दुर्घटना घडू नये. या समितीच्या अहवालानंतर कामात काही त्रृटी असतील तर त्या सुधारल्या जातील, असे संयुक्त महाप्रबंधक तथा जनसंपर्क अधिकारी डॉ.रघूनंदन झा यांनी कळवले आहे.


