14 हजारांची लाच भोवली : शिंदखेड्यातील खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात
14 thousand bribe: Private punter from Shindkheda in ACB’s net शिंदखेडा : शेतजमीन खाते फोड प्रकरणाचे काम करून देण्यासाठी नायब तहसीलदार आणि इतर अधिकार्यांच्या नावाने तडजोडीअंती 14 हजारांची लाच स्वीकारताना शिंदखेडा शहरातील खाजगी पंटराा धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तहसील कार्यालयात अटक केली. ही कारवाई मंगळवार, 10 रोजी दुपारी शिंदखेडा तहसीलच्या आवारात करण्यात आली. रीतेश अरुण पवार (शिंदखेडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे येथील शेतकर्याने याबाबत तक्रार दिली होती. त्यांच्या सामायीक शेतीची खातेफोड करावयाची असल्यामुळे ते शिंदखेडा तहसील कार्यालयात गेले असता बुधवार, 4 ऑक्टोबरला त्यांना संशयित रीतेश पवार भेटला. त्याने खातेफोड करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रकरण जमा करीत काम करून दिले व नायब तहसीलदार व इतर अधिकारी यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याने त्यांना प्रकरणाचे काम करून देण्याच्या मोबदल्यात साहेबांना 20 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. संबंधित शेतकर्याने धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवल्यानंतर शुक्रवार, 6 रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली व मंगळवारी पंचासमक्ष 14 हजार रुपयांची लाच घेताच रीतेश पवारला अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, वाचक अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शाखेचे उपअधीक्षक अभिषेक पाटील, निरीक्षक मनजीतसिंह चव्हाण, हेमंत बेंडाळे, रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.




