भुसावळात दसर्‍याच्या मुहूर्तावर वाहन बाजाराचा टॉप गियर


Top gear of the vehicle market on the occasion of Dussehra in Bhusawal भुसावळ : गेल्या काही महिन्यानंतर बाजारपेठेत दसर्‍याच्या मुहूर्तावर चैतन्याचे वातावरण असल्याने व्यापार्‍यांना बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. रेल्वे कर्मचार्‍यांना अलीकडेच मिळालेला बोनस पाहता बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होणार आहे. सर्वाधिक उलाढाल दुचाकी खरेदीतून होणार असून शहरात सुमारे 450 वर दुचाकींचे बुकींग करण्यात आल्याची माहिती शहरातील विविध शोरूम चालकांनी दिली. दरम्यान, शहरात मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रीज, रेफ्रीजरेटर, एसी, वॉशिंग मशीन आदींच्या खरेदीसह घरांसह प्लॉटच्या खरेदीतूनही कोट्यवधींची उलाढाल होणार आहे.

सोन्याला झळाळी : रीयल इस्टेट क्षेत्राचीही चांदी
दसर्‍याच्या मुहूर्तावर सोन्याच्या बाजारपेठेतही लाखोंची उलाढाल होण्याची अंदाज आहे. सोन्याच्या तयार दागिन्यांना वाढती मागणी असून त्यासोबतच सोन्याचे शिक्के तसेच सोन्याचा तुकडा खरेदीकडेदेखील ग्राहकांचा कल आहे. या शिवाय शहरातील सर्वच दुचाकींच्या शोरूममध्ये ग्राहकांनी आदल्या दिवशीच दुचाकींची नोंदणी केल्यानंतर मंगळवारी सुमारे साडेचारशेहून अधिक दुचाकींची विक्री होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच रो हाऊस, प्लॅट व तयार घरांचे बुकींग झाल्यानंतर दसर्‍याच्या मुहूर्तावर गृहप्रवेश होईल तसेच प्लॉट खरेदीकडेही ग्राहकांचा कल असून रीयल इस्टेट क्षेत्रातही मोठी उलाढाल होणार असल्याचे व्यावसायीकांकडून सांगण्यात आले.







झेंडू वधारला : दहा टन आवक
दसर्‍याच्या मुहूर्तावर झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असल्याने शहरात विक्रेते दाखल झाले आहेत. सुमारे दहा टनहून अधिक झेंडू शहरात दाखल झाला असून सोमवारी 40 ते 50 रुपये किलोप्रमाणे झेंडूच्या फुलांची विक्री सुरू होती तर मंगळवारी दर वाढण्याची शक्यता आहे. नाशिक, औरंगाबाद व जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेतून लाल व पिवळ्या रंगाचे झेंडू बाजारात विक्रीसाठी दाखल झासले आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !