नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात धुळे तालुक्यातील बालकाचा मृत्यू
आतापर्यंत तिघांचा ओढवला मृत्यू : बिबट्याच्या बंदाबस्ताची मागणी
A child in Dhule taluka died in a man-eating leopard attack धुळे : नरभक्षक बिबट्याचा धुळे तालुक्यात हैदोस सुरू असतानाच हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आ हे.रमेश नरसिंह दुडवे (वय 9, पावरा) असे मयत बालकाचे नाव आहे. या बालकासह आतापर्यंत तिघांचा बिबट्याने बळी घेतल्याने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
झुंज ठरली अपयशी
धुळे तालुक्यातील बोरी परीसरातील मोघण येथील धाडरे रस्त्यावरील शेतातील घरात रमेश नरसिंह दुडवे (9, पावरा) हा कुटूंबासोबत झोपलेला असतांना बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. बालकाने आरडाओरड केल्यानंतर नागरीकांनी धाव घेत बिबट्याला पळवले. मात्र हल्ल्यात बालक जखमी झाल्यानंतर त्यास धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मानेवर बिबट्याने पंजा मारल्याने रमेशची प्रकृती गंभीर असतानाच या बालकाचा देखील रविवारी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी
आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेल्याने परीसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तातडीने बिबट्याला जेरबंद करावे अथवा त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.




