जळगाव जिल्ह्यात 27 नवीन रुणवाहिका दाखल होणार
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 19 रुग्णवाहिका खरेदी करण्यास पालकमंत्र्यांची मान्यता
27 new trains will be introduced in Jalgaon district जळगाव : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन 19 रुग्णवाहिका खरेदीस नुकतीच मंजुरी दिली. मागील महिन्यात ग्रामीण रुग्णालयांसाठी मंजूर केलेल्या आठ रुग्णवाहिका व आज प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर केलेल्या 19 रुग्णवाहिका अश्या एकूण 27 रुग्णवाहिका जिल्ह्यात फेब्रुवारीपर्यंत दाखल होतील. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
पालकमंत्र्यांनी दिली मंजुरी
जिल्हा वार्षिक योजना 2023-24 (सर्वसाधारण) निधीच्या माध्यमातून रूग्णवाहिका खरेदी करण्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जानवे (ता.अमळनेर), तामसवाडी (पारोळा), लोंढे, तरवाडे, खेडगाव (चाळीसगाव)
वरखेडी, लोहटार (पाचोरा), कठोरा, वराडसीम, पिंपळगाव (भुसावळ), अंतुर्ली (मुक्ताईनगर), भालोद, सावखेडा (यावल), नशिराबाद (जळगाव), भालोद (रावेर), गारखेडा, वाकडी (जामनेर), चांदसर, पाळधी (धरणगाव) साठी 19 नवीन रूग्णवाहिकांना पालकमंत्र्यांनी तातडीने मंजुरी दिली आहे. लवकरच याबाबत तांत्रिक मंजुरी साठी नाशिक उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात येऊन दोन दिवसांत मान्यता घेतली जाईल. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर टेंडर प्रक्रिया राबविण्यात येऊन फेब्रुवारी 2024 पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन 19 अद्यावत रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी दिली आहे.


आठ रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयात
जिल्हा रुग्णालय व अधिनस्त ग्रामीण रुग्णालयांना 8 नवीन रुग्णवाहिका खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नोव्हेंबर 2023 महिन्यात मंजुरी दिली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पाठपुराव्यामुळे रुग्णवाहिका खरेदीच्या प्रस्तावास आरोग्य सेवा आयुक्तांनी एका दिवसातच तांत्रिक मान्यता दिली होती. या रुग्णवाहिकांची सध्या टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जानेवारी 2024 पर्यंत या नवीन आठ रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयात रूग्णसेवेत दाखल होणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालय व त्यांच्या अधिनस्त सात ग्रामीण रूग्णालयांमध्ये न्हावी (यावल) अमळगांव (अमळनेर), मेहुणबारे (चाळीसगांव), पिंपळगांव हरेश्वर (पाचोरा), बोदवड, एरंडोल, भडगांव या 8 रुग्णालयांसाठी प्रत्येकी 1 (रुपये 18,06,300/- प्रति रुग्णवाहिकाप्रमाणे) अशा एकूण 8 पेशंट ट्रान्सपोर्ट टाईप बी एसी रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून वेळोवळी मदत करण्यात येत असते. नवीन रूग्णवाहिकांचा जिल्ह्यातील सर्वसामान्य रूग्णांना फायदा होणार आहे. भविष्यात ही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.





