रावेर लोकसभेसह विधानसभेच्या तीन मतदारसंघात राष्ट्रवादी लढणार ! : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांची पत्रकार परीषदेत माहिती
NCP will fight in three constituencies of Raver Lok Sabha and Legislative Assembly! : Nationalist District President Umesh Nemade भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) रावेर लोकसभेची निवडणूक तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील तीन मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार असून ही निवडणूक अत्यंत ताकदीने आम्ही लढणार असल्याचा दावा भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी येथे केला. सुरभी नगरातील संपर्क कार्यालयात गुरुवारी दुपारी तीन वाजता त्यांनी पत्रकार परीषद घेतली.
लोकसभेसह विधानसभेच्या जागांवर दावा
जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे म्हणाले की, राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी पक्ष सहभागी असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आम्ही तयारीला वेग दिला आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष रावेर लोकसभेची जागा लढणार असून रावेर लोकसभा अंतर्गत येणार्या तीन विधानसभा मतदारसंघातही आम्ही तगडा उमेदवार उभा करणार आहोत. तीन विधानसभेच्या जागा कुठल्या हे मात्र आम्ही लवकरच जाहीर करू, असे सांगून त्यांनी जागांबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.


चुरशीची होणार निवडणूक
रावेर लोकसभेची निवडणूक आगामी तीन महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे तर राज्यातील प्रमुख पक्ष भाजपा तसेच काँग्रेसने या जागेसाठी आतापासून लॉबींग केले असून त्यात आता राज्यातील सत्तेत सहभागी असलेला राष्ट्रवादी (अजितदादा गट) पक्षानेही उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर केल्याने रावेर लोकसभेची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. रावेर लोकसभा मतदार संघ अंतर्गत येणार्या तीन विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीने उमेदवार देण्याचा दावा केल्याने या ठिकाणी चुरशीची निवडणूक होईल, असा अंदाज आहे.
राष्ट्रवादीला अनुकूल वातावरण
हिवाळी अधिवेशनात शेतकर्यांना बोनस देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण मागणी मंजूर झाली असून शेतकर्यांच्या दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान, जुनी पेन्शन लागू करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, आदिवासी मागासवर्गीय यांच्या मागण्यांवर निर्णय, मराठा आरक्षणाचा उपायांसाठी खास अधिवेशन आदी बहुतेक सर्व प्रकारच्या विषयांवर चर्चा आणि महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी अनुकुलता दर्शविण्यासाठी अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. महिलांनी सुद्धा मागे न राहता चूल आणि मूल या पलीकडे जाऊन राजकारणात यावे, असे आवाहन यावेळी उमेश नेमाडे यांनी केले. राष्ट्रवादीला पोषण वातावरण असल्याने कार्यकर्त्यांमध्येही निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण असल्याचे ते म्हणाले.





