रेल्वेच्या पीओएच कारखान्यात आठ लाखांची चोरी : रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदारासह तिघांना अटक
कुंपणानेच खाल्ले शेत : चोरीत रेल्वे सुरक्षा बलाचा सहभागाने विभागात खळबळ
Theft of 8 lakhs in POH factory of Railways : Three arrested along with constable of Railway Security Force भुसावळ : रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून आठ लाखांच्या पॉवर केबल चोरीत रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदाराचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरपीएफच्या हवालदारासह तिघांना रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. अटकेतील संशयितांमध्ये सचिन उत्तम तायडे (25, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ), राहुल रतन मोरे (23, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ) व आरपीएफचे हवालदार शशिकांत गणपत सुरवाडे (57, स्वामी विहार, भुसावळ) यांचा समावेश आहे.
असे आहे चोरी प्रकरण
भुसावळातील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून सात लाख 94 हजार 227 रुपये किंमतीची 1604 किलो पॉवर केबल चोरीला गेल्याचा प्रकार 15 ते 16 डिसेंबरदरम्यान उघडकीस आला होता. तत्पूर्वी पीओएच कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरा, लेबर मेन गेट व सायकल स्टॅण्ड गेट, वर्कशॉप फेसिंग कॅमेरा, इरेक्शन फेसिंग कॅमेरा यांच्याशी छेडछाड करण्यात आल्याची बाब 11 नोव्हेंबर 2023 रोजी स्पष्ट झाल्यानंतर यंत्रणेचा संशय बळावला व त्यानंतर साहित्य तपासणी केल्यानंतर त्यात लाखोंची महागडी पॉवर केबल चोरीला गेल्याचे समोर आले.


विशेष पथकाकडून चौकशी अन् आरोपी जाळ्यात
रेल्वे सुरक्षा बलाचे डीएससी एच.श्रीनिवासराव व एएससी अशोक कुमार यांच्या नेतृत्वात चोरीच्या तपासासाठी एका पथकाची निर्मिती करण्यात आली. त्यात सीआयबी निरीक्षक एल.के.सागर, एसआयबीचे आशित शेख, विनोद खरमाटे, वसंत महाजन, अमोल पाटील, मनोज सोनवणे, इम्रान खान, महेंद्र बाबू कुशवाह, कॉन्स्टेबल गिरीराज जाधव, कॉन्स्टेबल निलेश पाटील यांचा समावेश होता. विशेष पथकाने तपासादरम्यान पीओएचमधील कंत्राटदार अंजूम पटेल यांच्याकडे काम करणारा राहुल रतन मोरे (23, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ) यास सुरूवातीला संशयित म्हणून ताब्यात घेतले.
आरपीएफ हवालदारासोबत केली चोरी
संशयित राहुल मोरे याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीकामी सचिन उत्तम तायडे (25, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ) याचे सहकार्य लाभल्याचे सांगितल्याने त्यास गुन्ह्यात आरोपी करून त्यास अटक करण्यात आली. दोघा संशयितांच्या कबुली जवाबात आरपीएफचे हवालदार शशिकांत गणपत सुरवाडे (57, स्वामी विहार, भुसावळ) यांनी गुन्ह्यात मुद्देमाल विक्रीतून आलेली निम्मे रक्कम स्वीकारल्याचे व चोरीला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना गुन्ह्यात आरोपी करून अटक करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी रेल्वे न्यायालयात वरीष्ठ सरकारी अभियोक्ता अॅड.अजयकुमार सिंग यांनी रेल्वे सुरक्षा बलाची बाजू मांडली.
कुंपणाने खाल्ले शेत : यंत्रणेची मात्र ‘चुप्पी’
रेल्वे गाड्यांमधील चोर्या रोखण्यासह गुन्हेगारांना पकडणे तसेच रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करण्याची जवाबदारी रेल्वे सुरक्षा बलाची आहे मात्र गुन्हेगारांसोबतच थेट आरपीएफ हवालदाराने हातमिळवणी केल्याने सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदारावर अटकेची कारवाई झाल्यानंतरही रेल्वे सुरक्षा बलाच्या स्थानिक तपास अधिकार्यांसह वरीष्ठ अधिकार्यांकडून कुठलीही माहिती देण्यास असमर्थता दर्शवण्यात आली. दोषी कर्मचार्यावर आता कारवाई होते? याकडे आरपीएफ कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.
