भुसावळात पहिल्याच दिवशी 1800 हरकतींवर सुनावणी
प्रभाकर हॉलमध्ये उसळली गर्दी : पंधरा दिवसात अंतीम निर्णय
Hearing on 1800 objections on the first day in Bhusawal भुसावळ : भुसावळ पालिकेने केलेल्या चूकीच्या मालमत्ता पूर्नमुल्यांकनावर 5 हजार 140 हरकती प्राप्त झाल्या असून हरकतींवर नगररचना विभागाकडून बुधवार, 27 डिसेंबरपासून सलग तीन दिवस झोननिहाय सुनावणीला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी प्रभाकर हॉलमध्ये झालेल्या सुनावणीत 1800 हरकतदारांनी आपली कैफियत मांडत जादा मालमत्ताकराबाबत तक्रार केली. यावेळी नगररचना विभागातर्फे तक्रारदाराचे म्हणणे समजून घेण्यात आले. गुरुवार व शुक्रवारपर्यंत हरवतींवर सुनावणी चालणार असून त्यानंतर पंधरवड्यात हरकतींबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालिका उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांनी दिली.
पाच हजार 140 हरकती दाखल
पालिकेने मालमत्तांचे मोजमाप करीत कर मागणी पत्रकांचे वितरण केले. चुकीच्या करपध्दतीवर पाच हजार 140 हरकती पालिकेकडे दिल्या होत्या. या हरकतींवर बुधवारपासून तीन दिवस सकाळी दहा वाजेपासून झोननिहाय सुनावणी होणार आहे. पालिकेने यापूर्वी लोणारी मंगल कार्यालयात सुनावणी घेण्याचे नियोजन केले होते. यासाठी विविध झोननिहाय वेळापत्रक देण्यात आले मात्र आता सुधारीत निर्णयानुसार ही सुनावणी प्रभाकर हॉलमध्ये होणार आहे. पालिकेने या सुनावणीनंतर अंतीम करनिर्धारण करण्याचे नियोजन केले आहे. हरकतीनंतर संबंधीतांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यासोबतच जागेचे मोजमापही केले जाणार आहे.







