भामलवाडी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी रावेर तहसीलमध्ये ‘घंटानाद’

गुरांसह ग्रामस्थ रावेर तहसीलवर धडकले : ठिय्या आंदोलनाने खळबळ


‘Ghantanad’ in Raver Tehsil to remove encroachment on Bhamalwadi Gairan land रावेर : रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी सोमवारी ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केले. गायी, गुरे-ढोरे घेऊन थेट तहसीलदार धडक देत घंटानाद करीत ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने रावेर शहर दणाणले होते. प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

गायरान जमिनीवर अतिक्रमण
रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याने गावातील गायीसह इतर गुरांना चारण्यासाठी अडचणी येत आहेत.गायरान जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमण निर्मूलन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती मात्र गुरांची चार्‍याअभावी होणारी आबाळ पाहून ग्रामस्थ व्यथित झाले. शेवटी ग्रामस्थांनी गायीसह गुरांना घेऊन थेट रावेर तहसीलवर धडक दिली. राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली रावेर तहसील कार्यालयासमोर ठिय्या देऊन आणि घंटानाद आंदोलन केले.


अनोखे आंदोलन
गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी मागणीसाठी थेट गुरांना तहसील कार्यालयाच्या आवारात गाठून अनोखे आंदोलन ग्रामस्थांनी केले. तहसील कार्यालयात कामानिमित्त येणार्‍या नागरीकांमध्ये याबाबत चर्चा होती. आमच्या गुरांना चारा द्या, चारा द्या, गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढलेच पाहिजे अशा जोरदार घोषणा आंदोलनकर्त्यांनी देऊन परिसर दणाणून सोडला.

आश्वासनानंतर आंदोलन मागे
भामलवाडी गायरान जमिनीवरील अतिक्रमण शनिवार, 9 जानेवारी रोजी काढण्यात येईल असे लेखी पत्र प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष दिनेश पाटील, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, फौजदार दीपाली पाटील, गटविस्तार अधिकारी प्रवीण शिंदे, पुरुषोत्तम पाटील, सचिन घुगे, स्वप्निल पाटील उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !