मधुकर साखर कारखाना पुढील वर्षी सुरू होणार !

प्रशासनाने घेतला निर्णय : ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात बेणे पाठवणार


Madhukar sugar factory will start next year! फैजपूर : मधुकर सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात 43 वर्षे गळीत हंगामात निरंतर ऊस गाळप करणारा व नावलौकिक प्राप्त केलेला कारखाना आहे शिवाय या कारखान्याने शेतकर्‍यांशी निरंतर सेवाभाव व आपलेपणा जपला आहे. मधुकर सहकारी साखर कारखान्याची ऊस गाळप क्षमता प्रतीदिन दोन हजार 500 मेट्रिक टन असून प्रती दिन 30 हजार लिटर रेक्टिफाईड स्पिरीट उत्पादन क्षमतेचा आसवानी प्रकल्पसुध्दा आहे. हा कारखाना गळीत हंगाम 2024-25 मध्ये निश्चित गाळप करणार असल्याचे कारखाना प्रशासनाने कळवले आहे.

पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून चार ते पाच लाख टन ऊस गाळप करण्याचे मे. इंडिया बायो अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने उद्दिष्ट ठेवलेले आहे. येत्या दोन-तीन वर्षात ऊस गाळप क्षमता प्रतिदिवस तीन हजार 500 ते चार हजार मेट्रिक टनापर्यंत वाढवली जाणार आहे तसेच प्रतिदिवस 30 हजार लिटर रेक्टिफाईड स्पिरीट उत्पादन क्षमतेचा जुना आसवानी प्रकल्पा-व्यतिरीक्त नवीन प्रतिदिवस एक लाख 50 हजार लिटर क्षमता असलेला इथेनॉल प्रकल्प उभारण्याचे कंपनीने उद्दिष्ट ठेवले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत-कमी खर्चात जास्तीत-जास्त ऊसाचे हेक्टरी उत्पादन व साखर उतारा वाढ करण्यासाठी कार्यक्रम निरंतर राबविण्याचे कंपनीने नियोजन केले आहे. ऊस उत्पादकांनी कारखान्याच्या शंभर किलोमीटर परीसरात ऊस लागवड करावी असे आव्हानही मे. इंडिया बायो अ‍ॅड अ‍ॅग्रो पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीने कळवले आहे.


बेणे रक्कम खात्यात पाठवणार
कंपनी चालकांनी सांगितले की, कारखान्यासाठी ऊस लागवड करणार्‍या ऊस उत्पादकांना बेण्यासाठी हेक्टरी 10 हजार रुपये व रोपांपासून ऊस लागवड करणार्‍यानां हेक्टरी 15 हजार रुपये 12 टक्के व्याजाने मधुकर सह.साखर कारखाना प्रमाणे देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बेणे मालकाला बेणे पुरवठा कालावधीनुसार दर पंधरा दिवसांनी बेणे रक्कम बँक खात्यात पाठवली जाईल. कारखान्याने उसाची नोंदणी केल्याची पोहोच पावती ऊस उत्पादकास दिली जाईल. त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या उसाची कारखाना तोड वाहतूक करून देण्याची हमीही घेतली आहे. ऊसाच्या जाती व लागवडीनुसार ऊस तोडणी कार्यक्रम राहिल. नोंदणी केलेला संपूर्ण ऊस कारखान्यास पुरवठा करणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे. सतत पाच वर्षे ऊस पुरवठा करणार्‍या ऊस उत्पादकांचा ऊस कायम-स्वरूपी स्वीकारला जाईल. ऊस उत्पादकांनी वरील योजनेचा लाभ घेऊन कारखाना प्रशासनाने केलेल्या नियोजनाप्रमाणे ऊस लागवड करण्याचे सहकार्य करावे, असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !