थकबाकी प्रकरणी शिरसाड ग्रामपंचायतीचे चार सदस्य अपात्र
तिघांचे नाशिक आयुक्तांकडे दाखल केले अपिल
Four members of Shirsad Gram Panchayat disqualified in arrears case यावल : यावल तालुक्यातील शिरसाड ग्रामपंचायतीचे चार ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कराची थकबाकीची रक्कम वेळेत न भरल्याने अपात्र ठरले आहे. या चौघांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये अपात्र ठरविण्यात आल्याने तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. चारपैकी तीन सदस्यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाविरूध्द नाशिक आयुक्तांकडे अपिलल दाखल केले आहे.
थकबाकी न भरल्याने कारवाई
शिरसाड, ता.यावल ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी मालमत्ता कराची रक्कम ग्रामसेवक यांनी बजावलेल्या नोटीसीच्या मुदतीत न भरल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे याबाबत ज्ञानेश्वर तुकाराम सोनवणे यांनी पंचायत समिती व जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार निसारखा जहाबाज तडवी, ज्योती विलास बडगुजर, साधना काशिनाथ पाटील, उल्हास रूपचंद ढाके यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 14 ह अन्वये उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्या सहिने पत्र पाठवून अपात्र घोषित केले आहे. यामुळे यावल तालुक्यात ग्रामपंचायत व राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे.


तिघांचे अपिल : 19 जानेवारीला सुनावणी
शिरसाड ग्रामपंचायतीने अपात्र ठरवण्यात आलेल्या चार सदस्यांपैकी निसारखा जहाबाज तडवी, साधना काशीनाथ पाटील, उल्हास रूपचंद ढाके या तिघा सदस्यांनी कराची थकबाकी अदा केली आहे व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालाविरूध्द त्यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले आहे. या अपिलावर 19 जानेवारी रोजी सुनावणी होणार असून त्याकडे लक्ष लागले आहे.





