लोकसभेच्या अंतिम जागा वाटपाबाबत मविआची दिल्लीत बैठक
Maviya’s meeting in Delhi regarding the final allocation of Lok Sabha seats नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आल्यानंतर प्रत्येक पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यातच महाविकास आघाडीत जागा वाटपाचा अंतिम तिढा सुटत नसल्याने 14 वा 15 रोजी दिल्लीत अंतिम बैठक होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील मविआमध्ये सामील होण्याची शक्यता आहे तर दिल्लीतील बैठकीत जागा वाटपाचे अंतिम सूत्र निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रमुख नेत्यांची राहणार उपस्थिती
जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आदी नेते या बैठकीला उपस्थित असतील. जो पक्ष ज्या ठिकाणी मजबूत असेल ती जागा त्या पक्षाला दिली जावी, या सूत्राच्या आधारे मविआचे हे नेते जागा वाटपावर तोडगा काढतील. जागा वाटपाचा तिढा जितक्या लवकरात लवकर सुटेल तितका फायदा मविआला निवडणुकीत होईल, असं या सर्वच नेत्यांचं म्हणणं असल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.



तर असा असेल जागांचा फार्म्यूला
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा असून आतापर्यंत मविआचे विविध संभाव्य फॉर्म्युले समोर आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 18 ते 19 जागा, काँग्रेसला 13 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 10 जागा, वंचित आघाडीला 2 जागा, स्वाभिमानी शेतकरी पक्ष दोन जागा आणि बहुजन विकास आघाडी एक जागा देण्यावर एकमत होऊ शकते मात्र अजून चार जागांवर असलेल्या चर्चा अंतिम टप्यात आहेत.






