स्वच्छ सर्वेक्षणात भुसावळ पालिका राज्यात 33 व्या स्थानी

जिल्ह्यात चतुर्थ क्रमांक : ओडीएफ प्लसप्लस दर्जा : देशपातळीवर 159 रँकींग


Bhusawal Municipality ranks 33rd in the state in cleanliness survey भुसावळ : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास विभागाकडून घेण्यात आलेल्या देशभरातील शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षणात गतवर्षी भुसावळ पालिकेने मुसंडी मारत अमृत योजनेतील शहरात 19 वा क्रमांक पटकावला होता मात्र 2022-2023 या वर्षात चार झोनल रॅकींग रद्द करून यंदा प्रथमच राष्ट्रीय स्तरावर एकच रॅकींग करण्यात आल्याने भुसावळ पालिकेचा क्रमांक 33 लागला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये शहराने सहा हजार पैकी 4144.75 गुण मिळवून 98 रॅकींग मिळाले होते मात्र आता चार झोन ऐवजी केवळ राष्ट्रीय स्तरावर एकच झोन तयार करण्यात आला असून त्यात पालिकेने 4855 गुण मिळवत देशात 159 रॅकींग मिळवले आहे. राष्ट्रीय स्तरावर 159 तर राज्यात पालिकेने 33 वा क्रमांक व जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावल्याने भुसावळकरांसाठी ही बाब गौरवास्पद आहे.

जळगाव जिल्ह्यात पालिकेचा चतुर्थ क्रमांक
स्वच्छ सर्वेक्षणातील ओडी फ्री, घनकचरा व्यवस्थापन, बायोमायनींग, नागरिकांचा प्रतिसाद, सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेसमधील विविध निकषांचे डाक्युमेंटेशन आदींच्या निकषांवर ही स्पर्धा झाली. देशभरातील अमृत योजनेत समाविष्ठ असलेल्या 1 ते 3 लाख लोकसंख्येच्या 382 शहरांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणात यंदा भुसावळची कामगिरी आणखी उंचावली आहे. जळगाव जिल्ह्यातील पालिकांमध्ये भुसावळ पालिकेचा चौथा क्रमांक आला असल्याचे अमृत योजनेच्या प्रिया तायडे सांनी सांगितले.


गुणांसह रॅकींगही वाढले
विविध निकषांसाठी सहा हजार गुण होते. यापैकी शहराला गतवर्षी 2022 मध्ये 4144. 75 गुण मिळाले होते मात्र आता 2023 मध्ये 4855 गुण मिळाले आहेत शिवाय राष्ट्रीय स्तरावर 159 तर राज्यस्तरावर 33 वा क्रमांक मिळाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी चार झोनमध्ये विभागणी करण्यात आल्यानंतर त्यात पालिकेचा राज्यात 19 वा क्रमांक होता मात्र आता चार झोनचा एक राष्ट्रीय स्तरावरील झोन तयार करण्यात आला असून त्यात पालिकेचा 159 वा क्रमांक मिळाला आहे. गुणानुक्रमासह रॅकींगही पालिकेचे वाढले आहे. शहरात यंदा नाईट स्विपींग (रात्रीची स्वच्छता), हागणदारीमुक्ती, कचरा संकलन व प्रक्रिया या निकषांचे गुण वाढले आहेत. शहरातून दररोज निघणार्‍या किमान 70 मेट्रीक टन कचर्‍यांवर दररोज प्रक्रिया केली जाते. यासोबतच नालेसफाई, शहरातील प्रमुख मार्गावरील भिंती, बोगद्यांमध्ये रंगेबेरंगी चित्रांच्या माध्यमातून प्रबोधन, शौचालयांची स्वच्छता, नवीन शौचालयांची निर्मिती आदी उपाययोजना करण्यात आल्यानंतरही गुणानुक्रम वाढला आहे.

कचराकुंड्या वाढवण्याची गरज
शहरात यापूर्वी दररोज निघणारा कचरा उचलला जात नव्हता मात्र आता अहोरात्र कचर्‍याची उचल केली जात आहे मात्र शहरातील कॉलनी भागात अद्यापही घंटागाडी नियमित येत नसल्याची ओरड आहे तर सार्वजनिक जागेवरील कचरादेखील पुरेशा प्रमाणात उचलला जात नसल्याने ही बाबही आता पालिकेला गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. पालिकेने कचराकुंड्यांची संख्या वाढवली तर अजून सुधारणा होईल.

अशी राहिली सात वर्षांची कामगिरी 
2017 — 433
2018 — 69 (फास्टेट मुव्हर्स पुरस्कार)
2019 —-132
2020 — 69
2021 — 128
2022 —- 98
2023 —- 159

कचरा विलगीकरण घरूनच व्हावे
पालिका प्रशासनाने कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. यातून सेंद्रीय खतांची निर्मिती होते. शहरातील गुणानुक्रम वाढविण्यासाठी आता घरातून निघणारा कचरा विलगीकरण करून मिळावा, यासाठी प्रबोधन केले जात आहे. नागरीकांनी घरातच दोन डस्टबीन ठेवून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करून द्यावा. शहराचे मानांकन वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे पालिकेचे प्रशासक जितेंद्र पाटील यांनी सांगितले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !