रावेर-पाल रस्त्यासाठी कृती समिती रस्त्यावर उतरणार !

रावेर पाल रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्या : कृती समितीची मागणी


The action committee for Raver-Pal road will go on the road ! रावेर : रावेर तालुक्यातील पाल रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणी रावेर-पाल रस्ता महामार्ग कृती समितीने खासदार रक्षा खडसे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कृती समितीने दिलेल्या निवेदनानुसार, 2016 मध्ये भारत सरकारच्या रस्ते परीवहन आणि राजमार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी मध्यप्रदेशमधील धार, बिस्टानमार्गे पाल, कुसुंबा, मुंजलवाडी, रावेर हा रस्ता महामार्ग क्र.347 सी म्हणुन घोषित केलेला आहे. भारत सरकारने प्रकाशित केलेल्या राजपत्रात व नकाशामध्ये या हायवे रस्त्याचा ठळकपणे उल्लेख आहे मात्र मागील आठ वर्षापासून कोणतीच कारवाई न झाल्यामुळे रावेर-पाल रस्ता हा आजही प्रजिमा क्र.1 म्हणूनच शासन दरबारी ओळखला जात असल्याने या रस्त्याचे इस्टीमेट प्रत्येक वेळी हलक्या प्रतीच्या बांधकाम साहित्याने तयार होत आहे. या रस्त्याने दररोज शेकडो मालवाहू व अवजड कंटेनरची वाहतूक होत असल्याने हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा न दिल्यास कृती समिती आंदोलनावर उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

महामार्ग लढ्यासाठी कृती समिती
या परीसरातील नागरीकांना या रस्त्याचा व अवजड वाहनांचा नाहक त्रास करावा लागत आहे. पाल, निमड्या, सहस्रलिंग, मुंजलवाडी, कुसुंबा खुर्द, कुसुंबा बु.॥ लोहारा, शिंदखेडे येथील सर्व राजकीय पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र येत सर्वपक्षीय रावेर पाल रस्ता हायवे कृती समिती तयार करुन हा रस्ता प्रजीमामधून हायवेमध्ये रुपांतर करण्यासाठी लढा उभारला आहे. सर्व आदिवासी भागातील पेसा ग्रामपंचायत व इतर ग्रामपंचायतीनी ग्रामसभा आयोजित करून सर्व ग्राम पंचायतीनी सदर रस्ता प्रजिमामधून दर्जोनती केरून राष्ट्रीय महामार्गमध्ये रुपांतर करण्याचे सर्वानुमते ठराव पारीत केला आहे.



अवघड वाहनाच्या वाहतूक बंदी घाला
रावेर-पाल महामार्ग कृती समितीने रावेर लोकसभा मदारसंघ खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांची भेट घेऊन चर्चा केली. रस्ता लवकरात-लवकर महामार्गामध्ये रुपांतरीत करावा तसेच जोपर्यंत हा रस्ता महामार्गामध्ये रुपांतरीत होत नाही तो पर्यंत रावेर व पाल या दोन्ही ठिकाणी नाकाबंदी करून या रावेर-पाल रस्त्याने होणारी अवजड वाहनांची वाहतूक तत्काळ बंद करावी अन्यथा -पाल रस्ता हायवे कृती समितीचेवतीने सनदशीर मार्गाने आंदोलन करून या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

यांना दिले निवेदन
निवेदनाच्या प्रती अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग धुळे, तहसीलदार रावेर यांना देण्यात आलेले आहे. यावेळी रावेर-पाल रस्ता हायवे कृती समितीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती योगेश पाटील, कुसुंबा खुर्द सरपंच मुबारक तडवी, उपसरपंच मुकेश पाटील, रतन पावरा (निमड्या), लियाकत तडवी (लोहारा), अशोक हिवराळे (मुंजलवाडी), प्रदीप सपकाळे, नारायण घोडके, अतुल महाजन, चांगो भालेराव, निवृत्ती महाजन, कामिल तडवी, अरमान तडवी, धरमसिंग पाटील, रवींद्र महाजन आणि कृती समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !