अट्रावलचा संशयीत सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार
Atraval’s deportation from Jalgaon district for six months on suspicion यावल : यावल तालुक्यातील अट्रावल गावातील सागर अनिल तायडे (35) या तरुणाला जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. संशयिताविरुद्ध 2016 पासून ते 2023 पर्यंत विविध प्रकारचे तब्बल पाच गुन्हे दाखल आहेत शिवाय 110 अंतर्गत प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली. तरुणाविरोधात यावल पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर फैजपूर उपविगागीय प्रांताधिकारी यांनी त्यास सहा महिन्यांकरीता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यावल पोलिसांनी या तरुणाला ठाणे जिल्ह्यात सोडले आहे. यापूर्वी देखील याच गावातील एका तरुणाविरुद्ध स्थानबध्दतेची कारवाई झाल्याने तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.
तरुणाची भिवंडीत रवानगी
अट्रावल गावातील रहिवासी सागर अनिल तायडे (35) या तरुणावर 2016 मध्ये दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल होता. त्यानंतर पुन्हा 2018 मध्ये, 2020 मध्ये व 2023 मध्ये दंगलीचे दोन गुन्हे दाखल झाले. एकूण दंगलीचे पाच गुन्हे या तरुणावर दाखल होते व त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती. यावल पोलिसांनी फैजपूरचे प्रांताधिकारी देवयानी यादव यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यास प्रांताधिकार्यांनी मंजुरी दिली. हवालदार किशोर परदेशी, संदीप सूर्यवंशी, अशोक बाविस्कर यांनी या तरुणाला सहा महिन्यांसाठी हद्दपारीचे आदेश बजावत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात सोडले.


