भीषण अपघात : चारचाकी दुभाजकावर आदळल्याने तिघे जागीच ठार


कवठेमहांकाळ : भरधाव चारचाकी वाहन दुभाजकावर जोरदार आदळून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता.कवठेमहांकाळ) येथील उड्डाणपुलावर सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात सूर्यकांत दगडू जाधव (52), गौरी विनायक जाधव (35) व युवराज विजय जाधव (32, सर्व रा. हेड पोस्ट ऑफिस, रमणमळा, कोल्हापूर) यांचा मृत्यू ओढवला तर प्रशांत पांडुरंग चिले (40, रामानंदनगर, कोल्हापूर) हे गंभीर जखमी झाले.

ताबा सुटल्याने भीषण अपघात
कोल्हापूर येथील जाधव कुटुंब सूर्यकांत जाधव, गौरी जाधव, युवराज जाधव व प्रशांत चिले हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. पंढरपूरहून ते कोल्हापूरला चारचाकी गाडीतून (एम.एच.09 जी.एफ.8323) येत असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीत आले असताना चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी वाहन उड्डाणपुलावरील दुभाजकावर जाऊन जोरदार आदळले.



यामध्ये जाधव कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रशांत चिले हे गंभीर जखमी झाले. त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृतांचे कवठेमहांकाळ येथे उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !