वारी आषाढीची, वारी फार्मर कप उपक्रमात जिल्हाधिकार्यांनी साधला शेतकर्यांशी संवाद
भुसावळ (25 जुलै 2026) : माझे शेत… माझे पंढरपूर! या भावनेतून वारी फार्मर कप उपक्रमांतर्गत शेतकरी गटांच्या शेतावर विठ्ठल-रखुमाई पूजन करून भक्तिमय, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संपूर्ण वेळ उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधत उपक्रमाला विशेष प्रोत्साहन दिले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले, तहसीलदार नीता लबडे, तालुका कृषी अधिकारी ऋषिकेश चौधरी, संपूर्ण कृषी विभाग भुसावळ टीम, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रल्हाद अडसूळ, कृषी मेंटॉर संगीता पाटील, उमेद मेंटॉर राहुल ठोसरे, प्रियंका पाटील व प्रियंका बैसाणे यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शेतकरी गटांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या शेतीतील विविध नवोपक्रमांची माहिती जाणून घेतली. विशेषतः महिला शेतकर्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक करत त्यांनी त्यांचा उत्साह वाढविला.
महिला कापूस शेतीशाळेला क्षेत्रभेट
महिला कापूस शेती शाळेच्या क्षेत्रभेटीदरम्यान दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, चिकट सापळे, पक्षी थांबे, जीवामृत, फेरोमन सापळे, एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच ड्रोनद्वारे फवारणी अशा शाश्वत आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या विविध प्रात्यक्षिकांची पाहणी करण्यात आली.
शेतकरी एकजुटीची वारी
त्यानंतर जिल्हाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, भजनी मंडळ, महिला शेतकरी आणि शेतकरी गट यांच्या सहभागातून तब्बल 2 किलोमीटरची पायी वारी काढण्यात आली. विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ही वारी कार्यक्रमस्थळी पोहोचली. ही वारी केवळ भक्तीची नव्हती, तर शेतकरी एकजुटीची, आधुनिक शेतीतील नवोपक्रमांची आणि समृद्ध कृषी भविष्याची प्रेरणादायी वारी ठरली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भुसावळ, उमेद अभियान, भुसावळ तसेच पाणी फाऊंडेशन, जळगाव यांच्या संपूर्ण टीमने उल्लेखनीय परिश्रम घेतले.



