यावलला अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूलच्या गस्तीपथकाने पकडले
Revenue patrol caught tractors transporting illegal sand to Yaval यावल : शहरात महसूल विभागाच्या गस्तीपथकाने अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर जप्त केले आहे. श्री महर्षी व्यास मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली. पथकाने ट्रॅक्टर पकडल्यानंतर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता तो नसल्याने वाहन जप्त करीत तहसील कार्यालयात जमा करण्यात आले व मालकास दंडाची नोटीस बजावण्यात आली.
कारवाईने उडाली खळबळ
यावल शहरात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौणखनिज विरोधी गस्तीपथक गस्तीवर होते. गस्ती पथक प्रमुख मंडळाधिकारी सचिन जगताप, तलाठी मिलिंद कुरकुरे सह आदींना श्री महर्षी व्यास मंदिराजवळ ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 बी.जी. 5149) हे वाळु नेत असतांना मिळून आले. पथकाने ट्रॅक्टर थांबवले असता त्यामध्ये एक ब्रास वाळू होती. ट्रॅक्टर चालकाकडे परवाना मागितला असता त्याच्याकडे परवाना नसल्याने पंचनामा करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. ट्रॅक्टर मालक साहेबराव उत्तम सोनवणे यांना दंडा संदर्भात नोटीस देण्यात आली. या कारवाईमुळे अवैद्य गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

