फैजपूरात वीज तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे पाच लाखांच्या गव्हासह ऊस खाक

महावितरणच्या गलथान कारभाराचा संताप : शेतकर्‍याचा मदतीसाठी आक्रोश


Sugarcane along with wheat worth 5 lakh lost due to short circuit of power lines in Faizpur फैजपूर : शेतातील लोंबकळणार्‍या वीज तारांमध्ये शॉर्ट सर्किट होवून आग लागल्याने शेतकर्‍याचा पाच लाखांचा गहू, चारा हरभरा जळून खाक झाला तर शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्यानंतर लगतच्या शेतकर्‍यांच्या हरभरा पिकाचे नुकसान टळले. आगीची घटना गुरुवार, 14 रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास पिंपरूड शिवारातील आकाश लक्ष हॉटेल समोरील चावदस सराफ यांच्या शेतात घडली. फैजपूर व सावदा नगरपालिकेच्या बंबालाही पाचारण करण्यात आले.

शॉट सर्किटने लागली आग
चावदस सराफ यांचे शेत बटाईने लुमदास सराफ यांनी केले आहे. या शेतातील कापणीस आलेला गहू व कडबा चार्‍याला शेतातील वीज तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानंतर आग लागली. गुरुवारी दुपारी दिड ते दोन वाजेच्या सुमारास आग लागल्यानंतर इंडिया ऑटो गॅरेजचे शेख आसीफ यांनी सहकार्‍यांसह आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्याने नजीकच्या शेतकर्‍याचे हरबरा पिकाचे नुकसान वाचले.



पाच लाखांचे नुकसान
पिंपरुड पोलीस पाटील हरीष चौधरी, तुषार चौधरी, माजी पोलीस पाटील ज्ञानदेव चौधरी, माजी सरपंच डोंगर चौधरी, लिलाधर चौधरी, ललित चौधरींसह ग्रामस्थांनी आग विझवण्याकामी मोलाची मदत केली. वार्‍याचा वेग प्रचंड असल्याने आगीची झळ शेजारी उभ्या असलेल्या ललित चौधरी यांच्या ऊसाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची बातमी कळतात फैजपूर महसूल मंडळाधिकारी हबीब तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर तलाठी तेजस पाटील, न्हावी तलाठी ए.एस.महाजन, न्हावी-पिंपरुड तलाठी रेखा एस.जोरवार, बी.टी.तायडे, महसूल टीम घटनास्थळी तत्काळ दाखल झाली व नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. गहू, कडबा व चारा एक लाख 98 हजारांचे तर उसाचे सुमारे तीन लाखापर्यंतचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.

शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न
याप्रसंगी महावितरणचे आमोदा प्रभारी उपअभियंता संदीप पाटील, उपकार्यकारी अभियंता नितीन पाटील (फैजपूर), वायरमन कुंदन बोरवले, मयूर नेहते, लाईनमन राकेश आढळे उपस्थित झाले. यावेळी महावितरण अधिकारी यांच्याशी शेतकरी यांचा वाद झाला. संतप्त शेतकर्‍यांनी विहिरीत आत्महत्येचा प्रयत्न केला असता त्यांना उपस्थितांनी रोखले. महावितरण अधिकारी यांच्याशी पुनश्च संवाद साधून तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष निलेश राणे, जि.प.चे माजी सदस्य भरत महाजन, अजय बढे, माजी नगरसेवक अमोल निंबाळे, शेख कुर्बान, अनंता नेहेते, विजय सराफ, चावदस सराफ, रमेश अथवाणी, सुधाकर पाटील, चंद्रकांत भिरुड, निलेश कोल्हे, कुणाल कोल्हे आदींनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन शेतकर्‍याशी संवाद साधला.

तक्रारीकडे केराची टोपली म्हणून दुर्घटना
लोंबकळलेल्या विद्युत तारांमध्ये मोठ्या प्रमाणात शॉट सर्किट होत असल्याची तक्रार शेतकर्‍याने महावितरण ऑफिसमध्ये केली मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नुकसानीचा प्रकार घडल्याचे शेतकर्‍याने सांगितले. वीज कंपनीने नुकसानीची भरपाई द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !