पहूर भागातील महिला बचत गटाच्या महिलांना लाखोंचा चुना लावणार्या भामट्याला अटक
पहूर पोलिसांची कारवाई : शेकडो महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता
पहूर : बचत गटाच्या महिलांना बँकेकडून कर्ज व इन्शुरन्स मंजूर करण्याच्या नावाखाली भामट्याने शेकडो महिलांना लाखो रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी एका महिला बचत गटाच्या अध्यक्षांनी तक्रार दाखल केल्यानंतर पहूर पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीला चाळीसगाव तालुक्यातून शनिवारी रात्री उशिरा अटक केली. भामट्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अनिल यादव पंडित (46, सायगाव, ता.चाळीसगाव, हमु.आमखेडा, ता.सोयगाव, जि.संभाजीनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
भामटा अनिल पंडितने बचत गटाच्या महिलांना बँकेकडून कर्ज व इन्शूरन्स मंजूर करण्याची थाप मारत त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार ते दिड हजार रुपये उकळले होते. याप्रकरणी पहूर पोलिसात सीमा दीपक बारी (30, वाडीदरवाजा, शेंदुर्णी, ता.जामनेर) यांनी तक्रार नोंदवल्यानंतर आरोपी अनिल यादव पंडित (46, सायगाव, ता.चाळीसगाव, हमु.आमखेडा, ता.सोयगाव, जि.संभाजीनगर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने 17 जुलै 2024 सकाळी 10.30 वाजता तक्रारदाराच्या घरी जात फसवणूक केली तसेच संगीता आत्माराम बारी तसेच अन्य बचत गट सदस्यांची फसवणूक केल्याने आरोपीला पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहेत.

शासकीय अधिकार्यांच्या अडचणी वाढणार
आरोपीचे अनेक शासकीय अधिकार्यांशी लागेबांधे असल्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आरोपीच्या कॉल रेकॉर्डसह पोलीस कोठडीतील जवाबानंतर अनेक शासकीय यंत्रणेतील अधिकार्यांची चौकशी होवून कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
