सावखेडासीम शिवारात कांदा रोप नुकसानीचा जाब विचारल्यावरून वादानंतर दोन गटात हाणामारी
यावल (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील सावखेडासीम गावातून गायरानकडे जाणार्या रस्त्यावर शेत गट क्रमांक 154 मध्ये आयशर ट्रकने शेतातील कांद्याच्या रोपाचे नुकसान केले याचा जाब विचारण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये दोन जण जखमी झाले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका गटाकडून दोन जणांविरुद्ध तर दुसर्या गटाकडून चार जणांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी घडली.
काय आहे प्रकरण ?
सावखेडासीम गावातून गायरान जाणार्या रस्त्यावर शेटगत क्रमांक 154 आहे. या शेताला लागुन असलेल्या शेतात केळी भरण्यासाठी आलेल्या आयशर ट्रकने कांद्याचे रोपाचे नुकसान केले. आमच्या कांदा रोपचे नुकसान का केले ? याबाबत आशाबाई कडू जयकर (रा.दहिगाव) यांनी प्रकाश सुभाष पाटील व विजय विकास पाटील दोघे (रा.सावखेडासीम) यांना जाब विचारला आणि यावरून वाद झाला. या वादातून प्रकाश पाटील, विजय पाटील दोघांनी आशाबाई जयकर यांना शिविगाळ करीत लाकडी काठीने मारून दुखापत केली. आमच्या नादी लागली तर तुला जिवंत सोडणार नाही ? अशी धमकी दिली. आशाबाई जयकर यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तडवी करीत आहे.
दुसर्या गटाकडून चौघांविरुद्ध गुन्हा
प्रकाश पाटील यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आयशर ट्रकने कांद्याचे नुकसान केले. यावरून झालेल्या वादात त्यांना कडू चिंधु जयकर, पंकज कडू जयकर, परेश मधुकर तायडे व आशाबाई जयकर (सर्व रा.दहिगाव) या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. लाकडी काठीने मारून दुखापत करीत ठार मारून टाकण्याची धमकी दिली. चौघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.




