भुसावळात उद्या खड्डे चूकवून वाहने चालवा ; पाच हजार रुपये बक्षीस मिळवा स्पर्धा

भुसावळ शहरात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन


भुसावळ (6 सप्टेंबर 2024) : शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी अभिनव आंदोलनाचा इशारा दिला आहे. पालिकेने तत्काळ खड्डे न बुजल्यास शनिवारी सकाळी 11 वाजता जामनेररोडवर खड्डा चुकवा, पाच हजार उएक रुपये बक्षीस मिळावा ही स्पर्धा आयोजीत केली आहे. नाहाटा चौफुली ते पांडूरंग टॉकीज या मार्गावरील सर्व खड्डे चुकवून वाहने चालविणार्‍यांना हे बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेत तब्बल 1200 ते 1800 स्पर्धक सहभाग घेवू शकतील, असा अंदाजही ठाकूर यांनी वर्तवला आहे.

दिड हजारावर स्पर्धकांचा सहभाग
भुसावळ शहरातील रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे. या प्रश्नी पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी 7 सप्टेंबरला एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. नाहाटा महाविद्यालय चौफुली ते पांडूरंग टॉकीज या मार्गावर एकही खड्ड्यात वाहनाचे चाक न जावू देता वाहन चालविणार्‍या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यातील विजेत्याला पाच हजार एक रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेत शहरातील सुमारे 1200 ते 1800 स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. या मोठ्या संख्येतील नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा कोणत्याही स्पर्धकाला शारिरिक इजा झाल्यास यास पालिका प्रशासन जबाबदार राहिल, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.

रविवारी आंदोलनाचा इशारा
पालिकेने खड्डे तातडीने न बुजवल्यास 7 सप्टेंबरला अभिनव स्पर्धेनंतर रविवारी सकाळी खड्ड्यात बसून लाक्षणिक आंदोलन केले जाईल, असा इशाराही दुर्गेश ठाकूर यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !