एटीएममधून पैसे चोरी करणार्या युपीतील टोळीला बेड्या
A gang in UP who stole money from ATMs is in shackles नागपूर (12 सप्टेंबर 2024) : एटीएममधून पैसे चोरी करणार्या युपीतील टोळीला बेड्या ठोकण्यात यंत्रणेला यश आले आहे. अतुल विश्राम पाल (19), रोहित बहादुरसिंग (24, दोघे रा.तारापुर बाजार, लालगंज अजरा, जि. प्रतापगढ उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट चारची कारवाई
नागपूर शहरात सक्करदरा, नंदनवन, हुडकेश्वर, जुनी कामठी परिसरात असलेल्या विविध बँकांच्या एटीएममध्ये पट्टी टाकून पैसे काढण्यात येत असल्यामुळे तेथे अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 305 (अ), 324 (4) नुसार गुन्हे दाखल होते. तपासात सीसीटीव्ही फुटेजद्वारे तांत्रीक तपास करून गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने आरोपी अतुल आणि रोहितला ताब्यात घेतले. त्यांचे साथीदार पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी समृद्धी महामार्गाने पाठलाग करून धामनगाव येथे आरोपी शिवमुर्त रामखिलवान पाल (24, रा.रामनगर चौराह, ता.कुंडा जि. प्रतापगढ, उत्तरप्रदेश) यास चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले.

साडेपाचा लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींचे आणखी दोन साथीदार पसार झाले. आरोपींच्या ताब्यातून रोख 28 हजार 500 रुपये, तीन मोबाईल, एटीएममध्ये टाकत असलेल्या पट्टया असा पाच लाख 58 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
