भुसावळात श्री विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

विसर्जन मार्गाची डागडूजी : तापीनदीकाठी 100 सीसीटिव्ही व तीन टॉवरसह मार्गावर प्रखर प्रकाशाचे दिवे


भुसावळ : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पालिका व पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. यंदा सार्वजनिक व घरगुती गणपतींचे विसर्जन तापी नदीवरील राहुल नगर घाटावर होईल. पालिकेने विसर्जन स्थळासोबतच मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र जनरेटर, मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळावर अग्निशमन बंब, अ‍ॅब्युलन्स, वैद्यकीय पथक तैनात केले आहे. तापी नदीकाठावर निर्माल्य संकलीत केले जाईल तर तापीनदीत आपत्ती व्यवस्थापनासाठी बोट व 70 जीवनरक्षक आदी तैनात केले जाणार आहेत.

बसस्थानकाचे एक दिवस स्थलांतर
भुसावळ नगरपालिकेने श्रींच्या विसर्जन मिरवणूकीसाठी तयारी सुरु केली आहे. तापी नदीच्या राहुल नगर घाटावर एक जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बसस्थानक वरणगाव रोडवरील एसटी डेपोमध्ये हलविले जाणार आहे. वरणगावरोड व महामार्गावरुन एसटीची वाहतूक होईल. तर जामनेररोड अवजड वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे.

तीन टॉवर लाईट, 70 जणांचे बचाव पथक
यावल हद्दीमधील तापी नदीच्या उत्तरेकडील काठावर 10 हॅलोजन लाइट, राहूनगर घाटावर 30 हॅलोजन, दोन्ही ठिकाणी 3 टॉवर लाईट तात्पुरत्या स्वरुपात बसविण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 28 जणांचे बचाव पथक तर पालिकेचे 70 पट्टीचे पोहणारे जिवनरक्षक नदीपात्रात उपस्थित राहतील. पालिकेने यंदाही गणेश विसर्जनासाठी अंत्यत सुक्ष्म नियोजन केले आहे.

100 सीसीटिव्ही कॅमेर्‍यांची नजर
गणेशोत्सव मिरवणूकीवर यंदा 100 सीसीटिव्ही कॅमेर्‍यांची नजर राहिल. मिरवणूक मार्ग व नदीपात्रात सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. या सोबतच डीवायएसपी, शहर, बाजारपेठ पोलिस निरीक्षकांसोबत फिरते कॅमेरे असतील. यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्नावर पोलिसांची बारिक नजर राहणार आहे. पोलिसांसोबतच गृहरक्षक दल, राज्य राखीव दलाची तुकडी व अतिरिक्त पोलिस कुमक राहिल.

निर्माल्य संकलन सुविधा
श्रींच्या विसर्जनासाठी येणार्‍या भाविक भक्तांकडून निर्मल्य नदीपत्रात न टाकता ते नगरपालिकेच्या वतीने जमा करण्यात येणार आहे. यासाठी यावलरोडवरील वनविभागाचा नाका तसेच नदीकाठावर दोन टॅक्टरच्या माध्यमातून निर्माल्य संकलन केंद्र उभारले जाणार आहे. या निर्माल्य संकलन केंद्रावर भाविकांनी निर्माल्य दान द्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

गणेशभक्तांना रोपटे देणार भेट
तापीनदीवर गणेश विसर्जन करण्यासाठी येणार्‍या भाविकांना पालिका प्रशासनाकडून रोपटे भेट देवून त्यांनी ते जगवून संवर्धीत करावे, असे आवाहन केले जाणार आहे. पालिकेने गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करुन त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे.

भाविकांना सुविधा मिळेल
पालिकेने गणेशविसर्जन मिरवणूकीत कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या जबाबदारीचे आदेश काढले आहेत. शहारातील गणेश भाविकांना पालिकेकडून उत्तम दर्जाची सुविधा मिळेल. ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे, प्रखर प्रकाशाचे दिवे, तापीकाठावर जिवनरक्षक, बॅरिकेटींग, प्रार्थनास्थळाजवळील बंदोबस्त आदी सर्व उपाययोजना पालिकेने केली आहे. राजेंद्र फातले, मुख्याधिकारी, भुसावळ.

गारखेडे येथे श्री विसर्जनसाठी क्रेनची सुविधा
आमदार संजय सावकारे यांच्या सूचनेनुसार गारखेडा येथे श्री विसर्जनासाठी अष्टभूजा डेअरीचे संचालक नितीन धांडे यांच्या सौजन्याने क्रेन उपलब्ध करून देण्यात आली आहे. सायंकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत ही व्यवस्था असेल तर यावेळी प्रखर उजेड देणारे दिवे देखील असतील. मूर्ती विसर्जन ठिकाणी पाण्याची पातळी खोल असल्याने गणेश मूर्ती विसर्जनासाठी क्रेनचा भाविकांचा वापर करावा, असे आवाहन नितीन धांडे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !