अडीच लाख रुपयांच्या तगाद्यातून जळगावात विवाहितेची हत्या : तीन आरोपींना अटक
Murder of a married woman in Jalgaon for 2.5 lakh rupees : Three accused arrested जळगाव (11 ऑक्टोबर 2024) : दोघांना उसनवारीने दिलेले अडीच लाख रुपये सातत्याने परत मागण्याच्या वादातून त्रिकूटाने जळगावच्या रणछोड नगरातील विवाहिता सुवर्णा राजेश नवाल (57, रा.रणछोड नगर, गणेश वाडी, जळगाव) यांचा खून केल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांसह गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत अटक केली. लालबाबू उर्फ लाला रामनाथ पासवान (43, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव), सरलाबाई धर्मेंद्र चव्हाण (42, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव), राजेंद्र उर्फ आप्पा रामनाथ पाटील (58, रा.म्हसावद ता. जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
डोक्यात मारला हातोडा : विवाहितेचा मृत्यू
संशयीत सरला हिला दोन लाख तर लाला यास 50 हजार रुपये उसनवारीने दिल्यानंतर ते परत मागण्यासाठी विवाहिता सुवर्णा नवाल यांनी तगादा लावला होता. गुरुवार, 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास संशयीत व मयत हे हिशेब लिहत असताना पैशांच्या तगाद्यानंतर वादाची ठिणगी पडली व त्यानंतर त्यांनी विवाहितेच्या डोक्यात हाताडीचे घाव घालत पळ काढला, अशी प्राथमिक माहिती आतापर्यंत पोलीस तपासात समोर आली आहे.

मोबाईल रेकॉर्डनंतर गुन्ह्याची उकल
राजेश नवाल हे व्यापारी असून गुरुवारी रात्री ते घरी आल्यानंतर त्यांना पत्नीचा खून झाल्याचे दिसताच त्यांना धकक बसला. यंत्रणेला माहिती कळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. मयत सुवर्णा नवाल यांच्या मोबाईलवर दिवसभरात आलेल्या क्रमांकाची तपासणी केल्यानंतर त्यात संशयीताचा क्रमांक गवसल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.
डोक्यात हातोड्याचे घाव अन् आरोपींचे पलायन
संशयीतांसोबतच्या व्यवहारानंतर सुवर्णा यांनी पैसे मागितले व हिशोबासाठी संशयीत 10 रोजी महिलेच्या घरी आले व हिशेब सुरू असताना पुन्हा वाद उफाळला. लाला पासवान याने सुवर्णा यांच्या डोक्यात हातोड्याचे दोन जबर वार केले व अन्य संशयीतांसह पळ काढला.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हे जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीएसआय दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, विजयसिंग पाटील, राजेश मेंढे, संजय हिवरकर, एमआयडीसीचे पीएसआय दीपक जगदाळे, पीएसआय शरद बागल, किशोर पाटील, गणेश ठाकरे, रामहरी गीते आदींच्या पथकाने उघडकीस आणला.
