दुचाकीचे इंडिकेटर तुटल्याच्या वादातून अमळनेरच्या तरुणाचा खून : सहा संशयीत जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


अमळनेर (8 नोव्हेंबर 2024)  :दुचाकीचे इंडीकेटर तुटल्याच्या कारणावरून विकास प्रवीण पाटील (29 रा.अमळनेर) या तरुणाला मारहाण करून ठार मारण्यात आले. ही धक्कादायक घटना अमळगाव ते जळोद रस्त्यावर रविवार, 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजता घडली. या गुन्ह्यातील सहा संशयित आरोपींना नेरी, पाचोरा आणि पिळोदा अश्या ठिकाणाहून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने गुरुवार, 7 नोव्हेंबर रोजी दुपारी प्रसिध्दीपत्रकानुसार कळविली आहे.

असे आहे खून प्रकरण
विकास पाटील हा तरुण आपल्या मित्रांसोबत तमाशा पाहण्यासाठी गेला असता रविवार, 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घरी परतत असतांना त्यांच्या दुचाकीला स्विप्ट कार (एम.एच.19 बी.जे.4791) ने कट मारला. यात दुचाकीचे इंडीकेटर तुटले. यामुळे दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात काही जणांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून विकास पाटील याचा खून केला. त्यानंतर मारेकरी पसार झाले. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयीत आरोपींच्या शोधासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले. या गुन्ह्यातील सहा संशयीत आरोपींना बुधवार, 6 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता अटक करण्यात आली.

या आरोपींना केली अटक
संशयीत आरोपी अमोल वासुदेव कोळी, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव या तिघांना नेरीतून तर कमलाकर हनुमंत श्रीगणेश याला पाचोरा येथून तर रोहित सिताराम पाटील आणि मनोज हनुमंत श्रीगणेश याला पिळोदा येथून अटक करण्यात आली. सर्व आरोपींना अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी केली कारवाई 
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, संदीप पाटील, लक्ष्मण पाटील, दीपक माळी, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, रविंद्र पाटील, भगवान पाटील, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, राहूल महाजन, जितेंद्र पाटील, राहूल कोळी, विलास गायकवाड, भारत पाटील यांनी केली आहे.


कॉपी करू नका.