निर्भयाला मिळाला न्याय : चौघा आरोपींना अखेर फाशी
नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भयाप्रकरणी चारही आरोपींना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहारच्या जेल क्रमांक तीनमध्ये फाशी देण्यात आली. मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, फाशी देविनय शर्मा आणि पवन गुप्ताला फाशी देण्यात आल्याने सात वर्ष व तीन महिन्यांनी निर्भयाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकल्याने उपचारादरम्यान तिचा 29 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता.
रात्रभर झोपले नाहीत आरोपी
फाशीच्या काही तास आधी दोषीनी पुन्हा एकदा कायदेशीर डावपेच खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. दोषींचे वकील एपी सिंह यांनी फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली परंतु ती फेटाळण्यात आली. यानंतर एपी सिंह सुप्रीम कोर्टात गेले मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली. आरोपींना शुक्रवारी पहाटे फाशी निश्चित असल्याने ते रात्रभर झोपले नाहीत. दरम्यान, निर्भयाच्या आईने निर्भयाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करीत आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित असल्याचे सांगितल. या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल, असेही त्या म्हणाल्या.

