जळगावात पाच कोटी 59 लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या विटा जप्त
जळगाव (17 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पोलीस प्रशासनाकडून कारवाईला वेग देण्यात आला आहे. राज्यभरात रोकड जप्तीच्या कारवाया होत असताना जळगावातदेखील सोन्या-चांदीच्या पाच कोटी 59 लाखांच्या विटा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील तीन ज्वेलर्स दुकानाचा हा ऐवज असून पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ते कोषागारात रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तीन ज्वेलर्सचा ऐवज
शुक्रवारी रात्री आठ वाजता जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या आर.एल. चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान एमआयडीसी पोलिसांसह निवडणूक विभागाच्या पथकाने सीक्वेल कंपनीचे वाहन (एम.एच.12 यू.एम.5620) अडवल्यानंतर त्यात पाच कोटी 59 लाखांच्या सोन्या-चांदीच्या विटा आढळल्या. शहरातील बाफना, स्वस्तिक आणि निलांजली या ज्वेलर्सने पुण्याहून हे दागिणे मागवल्याचे स्पष्ट झाले आहे.

शनिवारी देखील पुन्हा पंचनामा करत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यानंतर सायंकाळी संपूर्ण दागिने एका पेटीमध्ये सीलबंद करत कोषागारात पाठवण्यात आले. दरम्यान, ज्या वाहनातून दागिने आले, त्या चालकाकडे संपूर्ण जीएसटी बिलाची कागदपत्रेही सोबत असल्याचे सांगण्यात आले.
