मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार

शहरात प्रचंड खळबळ : जळगावात पोलीस अधीक्षकांसह अधिकारी दाखल


जळगाव (18 नोव्हेंबर 2024) : मुक्ताईनगरात अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर अलीकडेच गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना जळगावातहील तांबापूरा भागातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर सोमवारी पहाटे चार वाजता अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता अज्ञाताने गोळीबार केल्याची माहिती अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांनी पोलिसांना दिली असून त्या दृष्टीने आता तपासाला सुरूवात करण्यात आली आहे.

दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याचा संशय
अहमद हुसेन शेख (50, रा.शेरा चौक, तांबापुरा परिसर, जळगाव) हे जळगाव विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार आहेत. शेरा चौकात ते राहतात व शिक्षक म्हणून शिक्षण सेवा करीत करतात. सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी पहाटे चार शेरा चौकातील नागरिक साखर झोपेत दुचाकीवरून आलेल्या संशयीांनी घरावर दोन गोळ्या झाडल्याचा उमेदवाराचा दावा आहे. या घटनेत घराच्या खिडकीचा काच फूटला आहे.

अधिकार्‍यांची धाव
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस स्टेशन निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कर्मचार्‍यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असता त्यात घटना कैद झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान हल्लेखोरांची माहिती काढून त्यांचा शोध घेणे सुरू झाले आहे.

प्रचार सुरूच ठेवणार
अहमद शेख यांनी सांगितले की, पहाटे गाढ झोपेत असताना अचानक काहीतरी फुटल्याचा आवाज आला. थोड्यावेळाने पाहिले तर खिडकीचा काच तुटलेला दिसला आणि एक गोळी दिसली. आणखी एक गोळी पोलीस शोधण्याचे काम करीत आहे. घटनेमागे नेमके काय कारण असू शकते हे निश्चित सांगता येत नाही मात्र मी आज शेवटच्या दिवशी प्रचार सुरूच ठेवणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !