युवकांनी जास्तीत-जास्त खेळांकडे वळून नशामुक्त भारताचा संकल्प पूर्ण करावा : भुसावळात मंत्री संजय सावकारे

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात


भुसावळ (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : भारत हा युवा शक्तीचा देश आहे. देशाच्या विकासामध्ये युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवकांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक ताकद, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसीत होत असल्याने अधिकाधिक युवकांनी खेळांकडे वळावे, असे विचार येथे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भुसावळ तालुकास्तरीय शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये सोमवारी झाले. या स्पर्धेत विविध शाळांमधील तब्बल 32 संघांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी मंत्री संजय सावकारे यांनी मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रोबेशनरी डी.वाय.एस.पी. प्रशांत दरेकर, बियाणी स्कूलचे प्राचार्य डी.एम.पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी मुकेश मोरे, विलास पाटील, हिंमत पाटील यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

खेळातून निरोगी व नशामुक्त समाजाची निर्मिती
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री संजय सावकारे म्हणाले की, आजच्या काळात युवकांसमोर विविध आव्हाने आहेत त्यामध्ये व्यसनाधीनता ही गंभीर समस्या आहे. नशामुक्त भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी युवकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून इतरांनाही त्यापासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी युवकांनी मोबाईल व इतर व्यसनांमध्ये वेळ न घालवता मैदानावर अधिकाधिक वेळ घालवावा. खेळ हे केवळ स्पर्धेपुरते मर्यादित नसून ते जीवन जगण्याची शिस्त शिकवतात. विजय-पराजय हा खेळाचा भाग आहे मात्र पराभवातून शिकून पुन्हा जोमाने उभे राहणे, प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करणे आणि संघभावनेने काम करणे ही खरी क्रीडा संस्कृती आहे.

खो-खो स्पर्धेतील विजेते
मुलांच्या 19 वर्षे वयोगटात गंगाधर सांडू चौधरी विद्यालयाचा संघ विजेता तर महात्मा गांधी विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. 17 वर्षे वयोगटात महर्षी व्यास विद्यालय, वेल्हाळेचा संघ विजेता, तर दादासाहेब दाबू पांडू पाटील विद्यालय, सोनगावचा संघ उपविजेता ठरला. 14 वर्षे वयोगटातही महर्षी व्यास विद्यालय, वेल्हाळेचा संघ विजेता, तर महात्मा गांधी विद्यालय, वरणगावचा संघ उपविजेता ठरला.

हॉलीबॉल स्पर्धेतील निकाल
मुलींच्या 17 वर्षे वयोगटात पंडित नेहरू विद्यालय, वराडसीमचा संघ प्रथम, तर अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचा संघ द्वितीय क्रमांकावर राहिला. 14 वर्षे वयोगटात अहिल्यादेवी विद्यालयाचा संघ प्रथम, तर बियाणी पब्लिक स्कूलचा संघ द्वितीय ठरला.

पंच म्हणून क्रीडा शिक्षकांचे योगदान
स्पर्धेतील पंच म्हणून डॉ.प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पाटील, हिंमत पाटील, मुकेश मोरे, योगी राठोड, नामदेव चव्हाण, निलेश राजपूत, दत्तू अहिरे, लक्ष्मीकांत नेमाडे, सुनील चौधरी, गणेश बोदडे, वंदना ठोके, अर्चना राजपूत आदींनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक तसेच बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या निमित्ताने बियाणी मिलिटरी स्कूलचे मैदान विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याने आणि उत्साहाने गजबजून गेले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !