भुसावळसह निंभोर्यात चाकूच्या धाकावर 45 हजारांची लूट : चौकडीविरोधात गुन्हा
Robbery of Rs 45,000 at knifepoint in Bhusawal and Nimbhora : Crime against quartet भुसावळ (17 डिसेंबर 2024) : भुसावळ बाजारपेठ हद्दीसह तालुका हद्दीतील निंभोरा येथे चाकूच्या धाकावर तब्बल 45 हजारांची लूट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, भुसावळ शहर हद्दीतही चाकूच्या धाकावर लूट झाल्यानंतर वाल्मीक नगरातील दोन आरोपींना पकडण्यात आल्यानंतर त्यांनीच वरील गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे शिवाय आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अटकेतील दोघांना सोमवारी भुसावळ सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली तर न्यायालयाचे आदेश होताच बाजारपेठ तसेच तालुका पोलीस आरोपींना आपल्या ताब्यात घेणार आहेत.
निंभोर्यात चाकू मारण्याची धमकी देत 20 हजार रुपये लूटले
दिनेश रामदास विखारे (46, गंगाराम प्लॉट, दीपनगर, भुसावळ) यांनी भुसावळ तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 9 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता निंभोरा गावातून जाणार्या बोगद्याजवळून जात असताना 25 ते 30 वयोगटातील चौघे आले व त्यातील दोघांनी आपले हात पकडले व आरडा-ओरड केल्यास चाकू मारू, अशी धमकी देत एकाने पँटच्या खिशातील 20 हजारांची रोकड काढून पळ काढला. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश दराडे करीत आहेत.
जामनेर रोडवर 25 हजार लूटले : चौकडीविरोधात गुन्हा
मनोजकुमार द्वारकादास अग्रवाल (58, राम मंदिर वॉर्ड, राजपूत गढी, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जामनेर रोडवरील डॉक्टर दीपाली पाटील यांच्या हॉस्पीटलजवळील गल्लीत चौघांनी रस्ता अडवत चाकू दाखवून पँटच्या खिशातून 25 हजारांची रोकड हिसकावून पळ काढला. याप्रकरणी रविवार, 15 रोजी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.